नाशिक : छाननीत ‘इतके’ अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार | पुढारी

नाशिक : छाननीत 'इतके' अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवारी (दि.12) पार पडली. छाननीनंतर निवडणूक मंडळाने कागदपत्रांत त्रुटी असल्याने 6 अर्ज बाद ठरविले आहेत. या निवडणुकीसाठी 24 जागांसाठी तब्बल 291 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या दोन्ही पॅनलच्या आक्रमक प्रचारामुळे जिल्ह्याचे वातावरण दिवसागणिक तापत आहे.

मविप्र संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सात दिवसांमध्ये जिल्हाभरातून विविध पदांसाठी तब्बल 305 उमेदवारांनी 410 अर्ज दाखल केले होते. एकाच इच्छुकाने अनेक पदांसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे दोन्ही पॅनलकडे सर्व पदांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. छाननीत नाशिक शहर संचालकपदाचे इच्छुक उमेदवार बबन रंगनाथ चव्हाणके यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. उमेदवारी अर्जावर चव्हाणके यांची स्वाक्षरी नाही, अनुमोदन क्रमांक व रजिस्टर क्रमांक चुकीचे असल्याचे कारण निवडणूक मंडळाकडून देण्यात आले आहे.

महिला संचालकपदाच्या इच्छुक उमेदवार उषा शिवाजी भामरे यांनी उमेदवारी अर्जासोबत शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र न जोडल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. दिंडोरी व पेठ तालुका संचालकपदाचे इच्छुक उमेदवार निवृत्ती एकनाथ घुमरे यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. घुमरे यांच्या अर्जावर सूचक हे सिन्नर तालुक्यातील, तर अनुमोदक हे नाशिक तालुक्यातील असल्याने त्यांचा अर्ज नाकारण्यात आल्याचे निवडणूक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सटाणा तालुका संचालकपदाचे इच्छुक उमेदवार नाना नामदेव दळवी व दिलीप सखाराम दळवी यांच्या अर्जावरील अनुमोदक हे दोन उमेदवारांना अनुमोदक असल्याने दोघांचेही अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. मात्र, नाना दळवी यांचे उपाध्यक्ष, चिटणीस व उपसभापती पदाचे अर्ज मंजूर झाल्याने ते अद्यापही रिंगणात कायम आहेत. तसेच दिलीप दळवी यांचेही उपाध्यक्ष, चिटणीस उपसभापती पदाचे अर्ज वैध ठरविल्याने त्यांची या पदांसाठी दावेदारी कायम राहणार आहे. दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक सेवक संचालकपदाचे इच्छुक बाळासाहेब काशीनाथ निफाडे यांचे मतदार यादीतील नाव नाठे बाळासाहेब काशीनाथ असून, उमेदवारी अर्जात आडनाव नाठेऐवजी निफाडे असे असल्याने तो अर्ज फेटाळण्यात आला आहे.

पात्र उमेदवार अर्जांची संख्या
अध्यक्ष – 12, उपाध्यक्ष – 29, सभापती – 10, सरचिटणीस – 8, चिटणीस – 28, इगतपुरी – 13, कळवण व सुरगाणा – 11, चांदवड – 6, दिंडोरी व पेठ – 5, नाशिक शहर – 5, नाशिक ग्रामीण – 9, निफाड – 19, नांदगाव – 9, सटाणा – 13, मालेगाव – 10, येवला – 10, सिन्नर – 9, देवळा – 9, महिला – 23, सेवक प्राथमिक व माध्यमिक – 14, सेवक महाविद्यालयीन – 6

हेही वाचा :

Back to top button