नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज | पुढारी

नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्य दिन आणि तिसरा श्रावणी सोमवार यंदा एकाच दिवशी आल्याने ब्रह्मगिरी फेरीला किमान पाच लाख भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज आहे. दुसरा शनिवार, रविवार, सोमवारी स्वातंत्र्य दिनाची सुटी, मंगळवारी पारशी नूतन वर्षारंभ अशा सलग चार सुट्यांमुळे यंदाचा तिसरा श्रावणी सोमवार शासकीय यंत्रणांच्या नियोजनाची कसोटी पाहणारा ठरणार आहे.

कोरोनामुळे सलग दोन वर्षे श्रावणातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा बंद राहिल्याने भाविकांनी यावर्षी श्रावणाच्या पहिल्याच दिवसापासून त्र्यंबकला केलेली गर्दी पाहता, यंदा किमान पाच लाख भाविक येण्याचा अंदाज लक्षात घेत महसूल, पोलिस अधिकार्‍यांनी सोमवारच्या नियोजनासाठी बैठका घेऊन शासकीय यंत्रणांची सज्जता ठेवली आहे. यावर्षी सलग आलेल्या शासकीय सुट्यांमुळे शुक्रवार 12 ऑगस्टच्या सायंकाळपासूनच त्र्यंबकेश्वरला गर्दी उसळणार असून, ती मंगळवार (दि.16) पर्यंत कायम राहणार आहे. दुसरा शनिवार, रविवार, सोमवारी स्वातंत्र्यदिनाची सुटी, मंगळवारी पारशी नूतन वर्षारंभ अशा सलग चार सुट्या आहेत. त्यातही श्रावणाचा तिसरा सोमवार असल्याने प्रदक्षिणेसाठी असेही दोन लाखांपेक्षा अधिक भाविक यापूर्वी येऊन गेलेले आहेत. प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना सूचना दिलेल्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर पथदीप सुरू असल्याची खात्री करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पोलिस यंत्रणांच्या वेळोवेळी बैठका घेऊन नियोजन पूर्ण केले आहे. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी प्रदक्षिणा मार्गाची पाहणी पूर्ण केली आहे.

व्यावसायिकांची चांदी : सलग दोन वर्षे कोविड लॉकडाउन असल्याने येथील अर्थचक्र थांबले होते. मात्र, यावर्षीच्या श्रावण महिन्यात ते वेगाने धावत आहे. येथील लॉजिंग बोर्डिंग पुढच्या काही दिवसांसाठी बुक झाले असून, सर्वच व्यवसायांना तेजी प्राप्त झाली आहे. खाद्यपेय, खाणावळ यांचीदेखील चलती दिसून येत आहे.

चार ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था : खंबाळे, पहिणे, अंबोली, तळवाडे येथील वाहनतळांची व्यवस्था करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शनिवार सायंकाळपासून खंबाळे व सर्व वाहनतळावर बाहेरची वाहने उभी करण्यात येतील. गेल्या रविवार, सोमवारचा अनुभव पाहता, खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्र्यंबकेश्वर शहरात अथवा बाहेर वाहने उभी करण्यास जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे वाहने खंबाळे येथे थांबविण्यात येतील. भाविकांना तेथून पुढे एसटी बसचा वापर करावा लागेल. भाविकांनी शक्यतो सार्वजनिक बससेवेचा प्रवासासाठी वापर करावा, खासगी वाहने आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंदिरात दर्शनाची कसोटी  :  त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन देताना मंदिर प्रशासनाची कसोटी लागणार आहे. सलग चार दिवस गर्दीचे वातावरण राहणार आहे. पहाटे पाचपासून रात्री नऊपर्यंत मंदिर गर्भगृह खुले असते. मात्र, येथील भौगोलिक रचना लक्षात घेता, एका भाविकाला गर्भगृहासमोर हात जोडून पुढे जाण्यासाठी लागणारा कालावधी अत्यंत कमी मिळत असतो.

Back to top button