नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे | पुढारी

नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील वादग्रस्त घंटागाडी ठेक्याची सुरुवात 16 ऑगस्टपासून होणार होती. परंतु, तत्पूर्वीच या प्रक्रियेला मनपाचे नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ब्रेक लावत यासंदर्भातील निविदा प्रक्रियेची फाइल लेखापरीक्षकांकडे तपासणीसाठी पाठविली आहे. यामुळे या तपासणीतून काय निघते याकडे लक्ष लागून आहे.

घंटागाडी ठेक्यात 354 कोटींचे झालेले उड्डाण, ठेकेदारांची दिलेली बँक गॅरंटी आणि बँक सॉल्व्हन्सी याबाबत ठेकेदारांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. काही ठेकेदारांनी सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचा संशय मनपा प्रशासनाला आहे. त्यामुळे लेखापरीक्षण विभागाच्या अभिप्रायानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे. घंटागाडीचा या आधीचा ठेका 176 कोटींचा होता. या ठेक्याची मुदत डिसेंबर 2021 मध्येच संपुष्टात आली आहे. तत्कालीन सत्तारूढ भाजपने 176 कोटींचा घंटागाडी ठेका तब्बल 354 कोटींवर नेल्याने अनेकांचे डोळे विस्फारले. प्रशासनातील काही अधिकार्‍यांनी विशिष्ट ठेकेदार नजरेसमोर ठेवत निविदा अटी-शर्तींत बदल करण्यात आले होते. ठेकेदारांकडून रिंग करण्यात आल्याने त्याच त्या ठेकेदारांना घंटागाडीचा ठेका मिळणार हे सर्वश्रुत होते आणि नेमके झालेही तसेच. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महासभेने केलेल्या ठरावानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. सहा विभागांसाठी चार ठेकेदार निविदा प्रक्रियेत पात्र ठरले. नाशिकरोडचा ठेका तनिष्क सर्व्हिसेसला, नाशिक पश्चिम व सिडको विभागाचे काम वॉटरग्रेस, तर सातपूर आणि पंचवटी विभागाचे काम ए. जी. एनरिवो इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले असून, नाशिक पूर्वचा ठेका मे. सय्यद असीफअली या ठेकेदाराला देण्यात आला आहे.

तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीनंतर रमेश पवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, त्यांनी याबाबत हस्तक्षेप केला नाही. ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देऊन त्यांच्यासोबत करारनामा करण्याची तयारी सुरू असतानाच, पवार यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आले. त्यांनी कार्यारंभ आदेश बाजूला ठेवून ही फाइल पुन्हा लेखापरीक्षण विभागाकडे तपासणीकरता सादर करत त्यावर अहवाल मागविला आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाने कार्यारंभ आदेश देण्याबाबतची फाइल सादर केली होती. याविषयी मला अधिक माहिती नसल्याने ती काटेकोर तपासून घेण्यासाठी फाइल मी लेखापरीक्षकांकडे सादर केली असून, त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर त्यांच्या अभिप्रायानुसार कार्यवाही केली जाईल.
– डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, आयुक्त

घंटागाडी ठेक्यासाठी अंदाजपत्रकात असलेली तरतूद किती आहे, त्यानुसार निविदा प्रक्रिया व प्राकलन तयार केले आहे की नाही याबाबत माहिती आयुक्तांनी मागविली असून, मागील आणि आताच्या ठेक्यातील फरक तसेच अटी-शर्ती याबाबतही तपासणी करण्याचे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी लेखापरीक्षण विभागाला दिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button