जागतिक सुलेखन दिन : विशेष संगणकाच्या युगातही सुलेखनाचे महत्व कायम | पुढारी

जागतिक सुलेखन दिन : विशेष संगणकाच्या युगातही सुलेखनाचे महत्व कायम

आजच्या संगणकाच्या युगातही सुलेखन अर्थात, सुंदर हस्ताक्षराला महत्व कायम असून, तज्ज्ञांमार्फत आयोजित केल्या जाणार्‍या सुंदर हस्ताक्षर कार्यशाळांना मिळणार्‍या उत्स्फूर्त प्रतिसादातून ही बाब समोर आली आहे. संगणकीय डिजिटल क्षेत्रात काम करणारे अनेकजण या कार्यशाळांना हजेरी लावून सुंदर हस्ताक्षराचे धडे गिरवत आहेत. संगणकीय किबोर्डवर चालविली जाणारी ही बोटे सुंदर हस्ताक्षरासाठीही वळविली जात असल्याचे चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर आणि जागतिक सुलेखन दिनानिमित्त सुलेखनकार पूजा नीलेश यांची घेतलेली मुलाखत…

सुलेखन म्हणजे काय व सुलेखनाचा उगम कसा झाला?
सुलेखन कला अर्थात, कॅलिग्राफी म्हणजेच सुंदर हस्ताक्षराची कला होय. ‘कॅलिग्राफी’ हा शब्द मूळ ग्रीक ‘कॅलीग्रॅफीया’ म्हणजेच ‘सुंदर अक्षर’ या अर्थाच्या शब्दापासून उत्पन्न झाला आहे. सुलेखन हे माणसाचे सामान्य हस्ताक्षर नसून त्याकडे एका विशिष्ट शैलीत प्रेरित होऊन सौंदर्यपूर्ण हस्ताक्षर या दृष्टिकोनातून पाहावे लागते. वाचनीयता हा अक्षरसौंदर्याचा प्राथमिक घटक होय. त्यादृष्टीने अक्षरांच्या उंची-लांबी-रुंदीप्रमाणे लेखणीच्या टोकाच्या (कटनिंब) जाडीच्या पटीत मांडलेली अक्षरे येतात. सुवाच्च, सुस्पष्ट अक्षर-लेखनाबरोबरच अक्षरांच्या सौंदर्यावर, अलंकरण व सजावटीवर सुलेखनात जास्त भर दिला जातो. सुलेखनामागे प्रामुख्याने कलात्मक उद्दिष्टे व प्रेरणा असतात आणि दर्शकाला सौंदर्यानुभूती व उच्च प्रतीचा कलात्मक आनंद देण्याची भूमिका त्यामध्ये असते. त्यामुळेच सुलेखन हा एक ललित कलाप्रकार मानला जातो. सुलेखनात वर्ण, अक्षरे यांची आकारिक चिन्हे (सिम्बॉल्स) ही कलात्मक आविष्काराची साधने म्हणून वापरली जातात.

सुलेखनाचे उद्दिष्ट काय आहे?
सुलेखनाचे आद्य व प्रधान उद्दिष्ट म्हणजे नेत्रसुखदता होय. अक्षरे डोळ्यांना सुंदर दिसली पाहिजे, हे आद्य प्रयोजनतत्त्व आणि ते साधण्यासाठी सुवाच्यता, सुस्पष्टता हे लेखनाचे मूळ गुणधर्मही दुर्लक्षिले जातात. पौर्वात्य लिपी वाचू न शकणार्‍या दर्शकालाही त्या लिपीतले अक्षरसौंदर्य मोहून टाकते. असे असले तरी, सुलेखनकलेच्या आदर्श, परिपूर्ण आविष्कारात सौंदर्य व वाचनसुलभता यांचा सुरेख मेळ साधलेला दिसून येतो.

सुलेखनासाठी कोणती साधने वापरली जातात?
सुलेखन करण्यासाठी सुलेखनकारांनी प्राचीन काळापासून ते आजतागायत वेगवेगळ्या प्रकारची माध्यम-साधने हाताळलेली असल्याचे दिसून येतात. उदा., पपायरस, भूर्जपत्रे, ताडपत्रे, मृदू चर्मपत्रे (व्हेलम), कापड, फलक, कागद इ. माध्यमे लेखनासाठी वापरली गेली आहेत. तसेच निरनिराळ्या प्रकारच्या लेखण्या, पक्ष्यांच्या पिसांच्या लेखण्या (क्विल), बोरू, कुंचले, टाक, पेन, निबांचे टोकदार, गोलाकार, तिरपे, चपटे यांसारखे विविध प्रकार, विविध रंगीत शाई व रंग अशी वेगवेगळी साधने त्यासाठी वापरली गेली आहेत. यापैकी अनेक माध्यम-साधने आजही वापरात आहेत.

मुलाखत : अंजली राऊत-भगत

हेही वाचा:

 

Back to top button