नाशिक : चिमुकलीच्या विक्रीचा डाव उधळला, अपहरण करणारा गजाआड | पुढारी

नाशिक : चिमुकलीच्या विक्रीचा डाव उधळला, अपहरण करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गौरी पटांगणावरून दहा महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या संशयितास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सातपूर परिसरातून ताब्यात घेतले आहे. अपहृत चिमुकलीची पोलिसांनी सुखरुप सुटका करून तिचा ताबा पालकांना दिला असून अपहरणकर्त्यास अटक केली आहे.

मकरंद भास्कर पाटील (रा. आनंद छाया अपार्टमेंट, सातपूर कॉलनी) असे या अपहरणकर्त्याचे नाव आहे. गौरी पटांगणावरील म्हसोबा मंदिराजवळ सोमवारी (दि.८) सायंकाळी ५.३० वाजता दहा महिन्यांची गायत्री खेळत होती. मात्र ती अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या आईने गायत्रीचा शोध घेतला. ती मिळून न आल्याने आईने पंचवटी पोलिसांकडे अपहरणाची फिर्याद दाखल केली. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांनी तपास सुरु केला. मध्यवर्ती गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी, अंमलदार श्रीराम सपकाळ, संजय गामणे, संदीप पवार, आनंदा काळे यांच्या पथकाने गायत्रीची माहिती घेत तपासास सुरुवात केली.

शहरातील बस-रिक्षा-रेल्वे स्थानकांसह वर्दळीच्या ठिकाणी गायत्री व अपहरणकर्त्याचा शोध सुरु केला. मंगळवारी (दि.९) रात्री खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित मकरंद पाटील यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या घरातच गायत्री आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी गायत्रीला ताब्यात घेत संशयित मकरंद यास पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. संशयित मकरंद हा मुंबईतील एकास चिमुकलीची विक्री करणार होता असे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

हेही वाचा :

Back to top button