नाशिक :..म्हणून पुरलेला मृतदेह पोलिसांनी पुन्हा काढला बाहेर | पुढारी

नाशिक :..म्हणून पुरलेला मृतदेह पोलिसांनी पुन्हा काढला बाहेर

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नीलगिरी बागेतील रहिवासी हिरामण महादू आहेर (45) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तो नीलगिरी बागेतील मोकळ्या मैदानात पुरल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी संशयावरून मृतदेह पुन्हा बाहेर काढत केलेल्या वैद्यकीय चाचणीत मृत्यू न्यूमोनियाने झाल्याचे निष्पन्न झाले.

हिरामण आहेर हे मूळ नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून, 15 वर्षांपासून ते नीलगिरी बाग परिसरात वास्तव्यास आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर ते या ठिकाणी पत्नी व दोन लहान मुलांसोबत राहत होते. नीलगिरी बाग येथे भंगार दुकानात काम करून हिरामण आहेर आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. यातच काही दिवसांपासून त्यांच्या पायाला गँगरिन होऊन जखमेत जंतू झाले होते. त्यांना चालता येत नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. शनिवारी (दि. 6) हिरामण आहेर यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी रात्रीच्या सुमारास नीलगिरी बागेत मोकळ्या मैदानात रितिरिवाजाप्रमाणे मृतदेह जमिनीत पुरला.

याबाबत आडगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी मंगळवारी (दि. 9) दुपारी नायब तहसीलदार नितीन पाटील, सर्कल ऑफिसर वसंत ढुमसे यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यात न्यूमोनियामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे आडगाव पोलिसांनी सांगितले आहे. हा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पुन्हा कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button