firing : उसनवारीच्या पैशांवरुन धुळ्यात युवकाची गोळी झाडून हत्या, दोघांना अटक | पुढारी

firing : उसनवारीच्या पैशांवरुन धुळ्यात युवकाची गोळी झाडून हत्या, दोघांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरातील कुमार नगरात गोळी झाडून तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हा खून जुगाराच्या उसनवारीच्या पैशातून झाल्याचे सांगितले जात आहे.

धुळे शहरातील कुमार नगर परिसरात राहणारा चंदन उर्फ चिनु पोपली या युवकाच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास भटू चौधरी, यासीन पठाण तसेच भटु चौधरी यांचा चालक गेले होते. यावेळी या तिघांनी चंदन पोपली याला त्याच्या घराजवळील चौकात गाठले. या तिघांमध्ये उसनवारीच्या पैशावरून वाद होण्यास सुरुवात झाली. या वादाने गंभीर स्वरूप धारण केले. यावेळी भटू चौधरी आणि त्याच्या चालकाने चंदन पोपली याला पकडून ठेवल्यानंतर यासीन पठाण याने त्याच्याकडील गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. ही गोळी चंदन पोपली याच्या छातीत वर्मावर बसल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मारेकर्‍यांनी घटनास्थळावरून पलायन केले.

दरम्यान परिसरातील नागरिकांनी चंदन पोपली याला तातडीने रुग्णालयात हलवले असता त्याचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आली. ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पथक देखील जिल्हा रुग्णालयात पोहोचले. यावेळी तातडीने हालचाली करीत भटू चौधरी आणि यासीन पठाण या दोघांच्या पोलीस पथकाने मुसक्या आवळल्या आहे. या संदर्भात पवन गुंडीयाल याने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात भादंवि कलम 302, 323 ,504 ,506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून उसनवारीच्या पैशावरून झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान चिनू पोपली आणि मारेकऱ्यांपैकी एकाची जुगाराच्या पैशावरून काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. या वादा संदर्भात पोपली याने पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देखील दिल्याची बाब सांगितली जाते आहे. याच कारणामुळे चिनूचा काटा कायमस्वरूपी काढण्यात आल्याची कुमार नगर परिसरात चर्चा सुरू आहे.

Back to top button