नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण | पुढारी

नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील भाम धरणग्रस्त काळुस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्याने गटशिक्षणाधिकार्‍यांनी शाळा सुरू करण्याचा आदेश विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला. उपाशीपोटी पायपीट करीत येणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये यासाठी अक्षरश: काही शिक्षकांनी लोटांगण घातले. मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असल्याने फायदा झाला नाही. अखेर गटशिक्षणाधिकारी यांनी सहकारी अधिकार्‍यांसह विद्यार्थ्यांना पुलावर गाठून चर्चा केली. तातडीने लेखी स्वरूपात शाळा सुरू होणार असल्याची घोषणा केली. यामुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात आनंद व्यक्त केला.

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळुस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद झाली होती. गटशिक्षणाधिकारी यांनी ही शाळा बंद केल्याने ग्रामस्थही संतापले होते. येथील पहिली ते चौथीचे चिमुरडे दरेवाडीपासून इगतपुरी पंचायत समितीमध्ये शाळा भरवण्यासाठी पायी निघाले होते. हे अंतर जवळपास 20 किमी असून, शाळा सुरू करण्याचे उपाशीपोटी आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी पायपीट करीत निघालेले होते. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मनमानीपणाने शाळा बंद करण्याचा विचित्र निर्णय घेतल्याने ग्रामस्थ संतापलेले होते. दरम्यान, दरेवाडी येथील बंद झालेली शाळा पुन्हा सुरू होण्यासाठी प्रसारमाध्यमांचे सहकार्य लाभल्याने विद्यार्थी आणि पालक यांनी आभार व्यक्त केले. आता शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट होणार आहे.

विस्ताराधिकार्‍यांची मनमानी; ग्रामस्थांमध्ये संताप
दरम्यान, काही शिक्षण विस्ताराधिकारी निव्वळ भटकण्यात पटाईत असून, शाळांवर त्यांचे लक्ष नसल्याची तक्रार तालुक्यातील नागरिक करतात. विस्ताराधिकारी मनमानी करून शाळा बंद करण्याचे अहवाल वरिष्ठांना देत असल्याने पिंप्रीसदो येथे मुस्लीम बांधवांमध्ये संताप आहे. याबाबत ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेणार आहे. एका आदिवासी दुर्गम शाळेतील एक शिक्षक बोरटेंभे शाळेत वर्ग केल्याने आणि दुसरा शिक्षक येतच नसल्याने त्या आदिवासी वाडीतील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.

हेही वाचा :

Back to top button