धुळे : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या ; दोघे जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी

धुळे : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या ; दोघे जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

धुळे, पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील मांजरी येथील बसस्थानकावरील रस्त्यावर भरधाव वेगाने जात असलेल्या दोन दुचाकी एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण हे जागीच ठार झाले असून एकाचे उपाचारादम्यान निधन झाले आहे. तर तीनजण गंभीर जखमी आहेत.

या अपघातात संजय सुभाष अहिरे (२३, रा.सूर्यबरडा, ता.सुबीर, गुजरात) व उमेश देवराम गावीत (रा.वडपाडा, ता.सुबीर, गुजरात) असे दोघे जागीच ठार झाले. यात जयेश मोतीराम पवार हा गंभीर जखमी झाल्याने त्यास धुळे येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचे धुळे येथे निधन झाले.

पिंपळनेर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सपोनि सचिन साळुंखे यांच्यासह पथकाने अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुभाष अहिरे, ईश्वर राजू देसाई, दिलीप शांता माळीच व आशिक राजा पवार हे चौघे आज दुपारी त्यांच्या दुचाकीने ( जीजे ३० / ई ३२११ ) मांजरी गावाकडून जात असताना समोरून उमेश देवराम गावित व जयेश मोतीराम पवार हे दुचाकीने ( जी जे ३०/ई ५२८४ ) येत होते. त्यावेळी दोन्ही दुचाकींची टक्कर झाली. यात सुभाष अहिरे आणि उमेश गावित हे दोघे ठार झाले. तर यात जयेश चा उपचारादरम्यान धुळे येथे मृत्यू झाला.

ही घटना मांजरी गावातील बसस्थानकावरील रस्त्यावर घडली. जखमींमध्ये आशिक राजा पवार, ईश्वर राजू देसाई, दिलीप शांता माळीच यांचा समावेश आहे. त्यांना पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश मोहने उपचार करीत आहेत. मयत मृतांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ईश्वर राजू देसाई याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार संजय अहिरे यांच्याविरूद्ध अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सपोनी सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मालचे घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button