नाशिक : अखेर ‘कृष्णा’ची मृत्यूशी झुंज अपयशी | पुढारी

नाशिक : अखेर ‘कृष्णा’ची मृत्यूशी झुंज अपयशी

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा
येथील जोपुळ रोडवरील काशीनाथ विधाते व केशवराव बनकर यांच्या वस्तीवरील कृष्णा नावाच्या मोराचे सोमवारी (दि. 1) अज्ञात व्यक्तीने पंख छाटले होते. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेला हा कृष्णा तीन दिवसांपासून वनविभाग, वन्यजीव रक्षक व विधाते, बनकर व डॉक्टर यांच्या देखरेखीखाली गणेश फार्म जोपूळ रोड येथील एका शेडमध्ये उपचार घेत होता. मात्र, पंख छाटल्याने कृष्णाला खूप गंभीर दुखापत झाली होती. अखेर गुरुवारी (दि.4) सकाळी सात वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.

या घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने कृष्णाचे शवविच्छेदन करून दुपारी शिरवाडे वणी येथील वनविभागाच्या जागेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. कृष्णाच्या घातपाती जाण्याने काशीनाथ विधाते, केशव बनकर, ताराबाई धुळे यांच्यासह परिवारातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. साडेतीन वर्षांपासून सर्व परिसरात लाडका झालेल्या मोराचा मृत्यू अमानुषपणे होईल याचा कधी विचारही केला नसल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चिंचखेड येथील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, लवकरच मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे व वनपरीमंडल अधिकारी देवीदास चौधरी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button