नाशिक : मनमाडला शेतकर्‍यांचा रास्ता रोको; बाजार समितीतील लिलाव रोखले | पुढारी

नाशिक : मनमाडला शेतकर्‍यांचा रास्ता रोको; बाजार समितीतील लिलाव रोखले

मनमाड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांत कांद्याच्या भावात सुरू झालेल्या घसरणीने शेतकर्‍यांचा संताप आज अनावर झाला. कांद्याला सातशे रुपये अनुदान आणि प्रतिक्विंटल तीन हजार रुपये दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी गुरुवारी (दि. 4) रस्त्यावर उतरले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मनमाड बाजार समितीत लिलाव बंद पाडले. त्यानंतर नाशिक-औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको करत वाहतूक बंद पाडली.

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. एकीकडे भाव नाही अन् दुसरीकडे चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत. त्यांना सरकारकडून कोणताही दिलासा दिला जात नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष परशराम शिंदे, तालुका अध्यक्ष नीलेश चव्हाण, निवृत्ती गारे, शरद शिलावट, राजेंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा थेट बाजार समितीत आला आणि तेथे सुरू असलेले कांद्याचे लिलाव बंद पाडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी शहरातून जाणार्‍या नाशिक-औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको करत वाहतूक बंद पाडली. संतप्त शेतकर्‍यांनी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांमुळे कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. आज मिळत असलेल्या भावात पिकावर केलेला खर्च तर सोडाच वाहतुकीवर केलेला खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव जाहीर करावा.

तसेच भाव घसरणीमुळे शेतकर्‍यांना नुकसानभरपाई म्हणून प्रतिक्विंटल 700 रुपये अनुदान देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलनात स्वाभिमानी संघटनेचे गोविंद पगार, श्रावण देवरे, गोपीनाथ झाल्टे, मच्छिंद्र वाघ, रवींद्र तळेकर, नीलेश चव्हाण, गजानन धोटेकर, सुभाष पवार, रामकृष्ण जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button