
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील दुसर्या क्रमांकाची शिक्षणसंस्था म्हणून नावलौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत यंदा जिल्ह्यातील तब्बल 10 हजार 197 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निफाड तालुक्यात सर्वाधिक 2,903 तर इगतपुरी तालुक्यात सर्वांत कमी 138 मतदार आहेत.
मविप्र समाज शिक्षणसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सभापती व उपसभापती या सहा प्रमुख पदांसह दोन महिला संचालक, 13 तालुका संचालक आणि तीन सेवक संचालक अशा एकूण 24 जागांसाठी निवडणूक राबविण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी अॅड. भास्कर चौरे यांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमण्यात आला असून, त्यामध्ये अॅड. रामदास खांदवे, अॅड. महेश पाटील, डॉ. ज्ञानेश्वर काजळे आदींचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार (दि.5)पासून प्रारंभ होत आहे. सेवक संचालकांच्या तीन जागांसाठी 463 सेवक सभासद मतदार असणार आहेत. त्यामध्ये उच्च माध्यमिक, महाविद्यालयाच्या 127 तर प्राथमिक व माध्यमिकच्या 336 सभासदांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनामुळे संस्थेच्या काही सेवक सभासदांचे निधन झाल्यामुळे यंदा मतदारांची संख्या घटली असली तरी संचालकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याने निकालालाही उशीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.