नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात सख्ख्या भावांचा मृत्यू | पुढारी

नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात सख्ख्या भावांचा मृत्यू

सिन्नर : (जि. नाशिक)  पुढारी वृत्तसेवा
मुसळगाव वसाहतीलगतच्या उज्ज्वलनगरमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघा सख्ख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली. हा स्फोट शनिवारी (दि.30) सकाळी 7.30 च्या सुमारास घडला.

कृष्णचंद्रा देवराज साकेत (27) व दीपराज देवराज साकेत (19, ह.मु. उज्ज्वलनगर, सिन्नर. मूळ रा. मध्यप्रदेश) अशी मृत परंप्रांतीय भावडांची नावे आहेत. या घटनेत शुभम महादेव सोनवणे (14) हादेखील गंभीर भाजला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

साकेत बंधू मूळचे मध्यप्रदेशातील रहिवाशी होते. काही दिवसांपासून मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात नोकरी करीत होते. शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास एकाने चहा बनविण्यासाठी गॅस पेटवला. मात्र तत्पूर्वीच गॅस गळती झालेली असल्याने गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यात हे तिघेही गंभीर भाजले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तथापि, कृष्णचंद्रा हा जवळपास 70 टक्के 75 टक्के भाजलेला होता. सोमवारी (दि.1) कृष्णचंद्राची तर मंगळवारी (दि.2) 60 ते 65 टक्के भाजलेल्या दीपराज याची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस हवालदार पी. एल. तुंगार, के. डी. काळे यांनी घटनेची खबर दिली. सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.

.आणि दुर्दैवी घटना घडली
या घटनेतील जखमी शुभम सोनवणे हा उज्ज्वलनगर भागात साकेत बंधूंच्या शेजारीच राहणार्‍या मावशी पूजा लांडगे यांच्याकडे आलेला होता. मात्र रात्री गप्पागोष्टी करीत तो साकेत यांच्याच खोलीत झोपी गेला होता, अशी माहिती मिळते. त्यातच ही भीषण घटना घडली आणि शुभम गंभीररित्या भाजला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा :

Back to top button