नाशिक : प्रतिकेदारनाथच्या दर्शनाला अलोट गर्दी, दर्शनासाठी भक्तांच्या रांगा | पुढारी

नाशिक : प्रतिकेदारनाथच्या दर्शनाला अलोट गर्दी, दर्शनासाठी भक्तांच्या रांगा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
श्रावण महिना सुरू झाला आणि त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या प्रतिकेदारनाथाच्या दर्शनाला भाविक पर्यटकांची गर्दी वाढत आहे. रविवारी या मंदिरात भक्तांच्या रांगा लागत असून, किमान एक तास दर्शनासाठी रांगेत थांबावे लागले.

मागच्या काही महिन्यांपर्यंत दुर्लक्षित असलेल्या मुळेगाव बारीतील शिवशक्ती आश्रमातील स्वरूपेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा लागत आहेत. मुळेगाव बारी परिसर वाहनांनी फुलला आहे. या परिसरात शासकीय सुटीच्या दिवशी जत्रा भरत आहे. पुण्याच्या फुलगाव येथील श्रुतीसागर आश्रमाची शाखा असलेला हा शिवशक्ती ज्ञानपीठ आश्रम आहे.

त्र्यंबकेश्वरजवळच्या वाढोली शिवारात अंजनेरी-मुळेगाव रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याशी प्रशस्त जागेत तो विस्तारलेला आहे. शिवशक्ती आश्रमाची स्थापना होऊन जवळपास 13 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. 2014 मध्ये आश्रमातील मंदिर ध्यानधारणा केंद्रासह स्वरूपेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. दोन डोंगरांमध्ये असलेल्या निसर्गरम्य परिसराकडे तब्बल सात वर्षे पर्यटकांचे याकडे लक्ष गेले नाही. काही महिन्यांपूर्वी या परिसरात नाशिक येथील गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी येथील परिसराचे मोबाइलने चित्रण केले. ते समाजमाध्यमातून फिरवले आणि केदारनाथ मंदिराप्रमाणेच बांधलेले स्वरूपेश्वर महादेव मंदिर हे बाजूस असलेल्या डोंगरकड्यांमुळे अल्पावधीत प्रतिकेदारनाथ म्हणून प्रसिद्धीस आले.

रोजगाराची संधी
आश्रम व्यवस्थापनाने मंदिरात जाण्यासाठी दर्शनबारी तयार केली आहे. भाविक तेथे रांगा लावत आहेत. शनिवार, रविवारी शेकडोंच्या संख्येने भाविक पर्यटकांची वाहने येतात. पर्यटकांच्या सोयी-सुविधेसाठी येथे हॉटेल व्यवसाय सुरू झाले आहेत. आजूबाजूचे ग्रामस्थ फळे, भाजीपाला, तांदूळ येथे विक्रीस आणतात. ग्रामस्थांना रोजगार मिळत आहे. तीर्थयात्रा आयोजित करणार्‍या कंपन्यांच्या बसदेखील येथे येत आहेत. आता हा आश्रम आणि मंदिर प्रतिकेदारनाथ म्हणून प्रसिद्धीस आले आहे.

हेही वाचा :

Back to top button