नाशिक : पोषण आहार वाटपाबाबत आठ अंगणवाड्यांची तपासणी | पुढारी

नाशिक : पोषण आहार वाटपाबाबत आठ अंगणवाड्यांची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या पंचवटी विभागातील आठ अंगणवाड्यांची तपासणी मंगळवारी (दि. 2) समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी केली. लवकरच सगळ्या अंगणवाडी शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांची पाहणी केली जात आहे. याआधी शाळांमध्ये पोषण आहारपुरवठा करताना झालेला घोटाळा लक्षात घेता मनपाने सावध पावले उचलल्याचे बोलले जात आहे.

नांदूर, मानूर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद भागातील अंगणवाड्यांना भेट देऊन मुलांची पटसंख्या, हजेरी याबाबत खात्री करण्यात आली. तेथील स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था अशा मूलभूत सोयी-सुविधा जाणून घेतल्या. शाळांमधील वैद्यकीय आणि पोषण आहाराच्या व्यवस्थेबाबत चौकशी केली. अंगणवाडीसाठी स्वतःची इमारत उपलब्ध असल्याबाबतही चौकशी केली. इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना प्राधान्याने इमारत उपलब्ध करून देण्याबाबत उपआयुक्तांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व अंगणवाड्यांची तपासणी केली जात आहे. समस्याही जाणून घेतल्या जात असल्याचे उपआयुक्त डॉ. मेनकर यांनी सांगितले. भेटीवेळी विभागीय अधिकारी कैलाक राभडिया, मुख्यसेविका गायकवाड आदी उपस्थित होते.

अंगणवाडीमधील सरासरी हजेरी
नांदूर- 60 विद्यार्थी, मानूर- 22 ते 26 विद्यार्थी, आडगाव (शाळा क्र. 22) – 30 विद्यार्थी, आडगाव (शाळा क्र. 23) – 26 विद्यार्थी, आडगाव (शाळा क्र. 25) – 27 विद्यार्थी, आडगाव वसंतदादा नगर (शाळा क्र. 21) – 30 विद्यार्थी, म्हसरूळ – (शाळा क्र. 36) – 32 विद्यार्थी म्हसरूळ – (शाळा क्र. 37)- 28 विद्यार्थी. मुलांची वैद्यकीय तपासणी होणार महापालिका क्षेत्रात एकूण 354 अंगणवाड्या आहेत. नुकतीच नाशिकरोड विभागातीलही 11 अंगणवाडी शाळांची तपासणी करण्यात आली होती. शाळांमधील सुविधा, पटसंख्या, पटसंख्येनुसार हजेरी याची तपासणी करण्यात येत आहे. शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांशीही अधिकारी संवाद साधत आहेत. कुपोषित बालकांचे निदान होण्यासाठी दर तीन महिन्यांनी अंगणवाडीतील मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button