
ओझर : मनोज कावळे
सारा गाव एकवटून हाती लाठ्या-काठ्या आणि दगडधोंड्यांनिशी उभा ठाकलेला असताना 'सद्रक्षणाय… खलनिग्रहणाय' हे ब्रीद सार्थ ठरवत फक्त सहा पोलिसांच्या मदतीने अपहृत चिमुकलीला मध्य प्रदेशातील लखापूर (ता. भिकणगाव) येथून ताब्यात घेऊन ऑपरेशन 'मुस्कान' फत्ते करून पालकांच्या हाती सोपविल्यानंतर त्यांच्या चेहर्यावरील आनंद आणि मृदू भाव निश्चितच पोलिसांना 'दुआ' दिल्यावाचून राहिला नाही.
तब्बल सहा दिवस अहोरात्र मेहनत घेत अपहृत चिमुकलीला ताब्यात घेण्याच्या ऐन वेळी मध्य प्रदेशामधील सारे लखापूर लाठ्या-काठ्या आणि दगडधोंडे हातात घेऊन उभे राहिले आणि दुसर्या बाजूला ओझरचे सहा पोलिस असा बाका प्रसंग… परंतु मागे हटायचे नाही, या जिद्दीने पेटून उठलेल्या पोलिसांनी दगडधोंडे, लाठ्या-काठ्यांचा मारा सहन केला… जणू काही युद्धाचाच प्रसंग लखापूर गावात तयार झाला होता, पण स्थानिक पोलिसांनीही कुमक पुरवली अन् ओझरच्या चिमुकलीला तब्बल नऊ दिवसांनंतर विकत घेणार्यांच्या ताब्यातून घेतले अन् ओझरच्या पोलिसांनी मध्य प्रदेशात ऑपरेशन मुस्कान फत्तेे केले… टीव्हीवरील एखाद्या गुन्हे तपास मालिकेतील कथानकाला साजेसा हा प्रसंग घडला अन् ओझरच्या चिमुकलीला पालकांकडे जाण्याचा मार्ग त्यामुळे सुकर झाला…
ओझर येथील भगतसिंगनगरमधील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार या मुलीच्या आईने 23 जुलैला ओझर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली, परंतु कोणतेही धागेदोरे हाती लागत नव्हते. अखेर या गुन्ह्याचा तपास ओझर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव, किशोर अहिरराव, जितेंद्र बागूल, रावसाहेब मोरे, राजेंद्र डंबाळे, महिला पोलिस उज्ज्वला पानसरे यांनी हाती घेतला आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. येथील एका गॅरेजबाहेरील कॅमेर्यात एक महिला या अल्पवयीन मुलीला घेऊन जाताना दिसली आणि पोलिसांना पहिला धागा मिळाला. या फुटेजमध्ये दिसणार्या प्रियंका देवीदास पाटील ऊर्फ प्रियंका पानपाटील या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केल्यानंतर तिने या अल्पवयीन मुलीला रत्ना कोळी (रा. दहावा मैल) हिच्या मदतीने शिरपूर येथील सुरेखा भिल हिच्याकडे सुपूर्द केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने शिरपूर येथील करवण फाटा गाठत रत्ना कोळी व सुरेखा भिल या दोघींना ताब्यात घेतले. त्यांच्या जबाबातून पोलिसांना अतिशय धक्कादायक माहिती मिळाली. या दोघींनी या अल्पवयीन मुलीला दीड लाख रुपयांना मध्य प्रदेशातील खरगोण जिल्ह्यातील लखापूर येथे विकल्याचे सांगितले.
चिमुकली मध्य प्रदेशात असल्याने पोलिसांपुढील आव्हान आणखी बिकट झाले. पथकाने ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांना संपर्क साधत संपूर्ण घटना कथन केली. त्यांनीही कोणताही वेळ न दडवता जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची परवानगी पथकाला मिळवून दिली. ओझरच्या तपास पथकाने वेळ न दवडता धुळ्यातून मध्य प्रदेशातील लखापूर गाठले. मुलीला ताब्यात घेण्यास आलेले पोलिस पाहून संपूर्ण गावच पोलिस पथकाविरोधात उभे ठाकले.
'हमारा पैसा दो, लडकी लेके जाव', असे म्हणत त्यांनी ओझर पोलिसांच्या वाहनावर दगडधोंड्यांचा मारा सुरू केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता, तेथील स्थानिकांनी लाठ्याकाठ्यांनी पोलिसांना मारण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून, स्थानिक पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आणि ऑपरेशन मुस्कान फत्ते केले.
अशा प्रकारे सात मुलींची विक्री
गरीब आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींना हेरायचे अन् त्यांना सावज करण्याची मोडस ऑपरेंटी ही या टोळीची असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. ओझर येथील भगतसिंगनगर येथील एक अल्पवयीन अजूनही बेपत्ता आहे. जिल्ह्यातील सात अल्पवयीन मुलींना अशाच प्रकारे विकल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
आदिवासी शक्तीसेनेचा सिंहाचा वाटा
काच परिसरातल्या दोन अल्पवयीन मुली तीन महिन्यांच्या अंतराने बेपत्ता झाल्यानंतर आदिवासी शक्ती सेनेचे अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे यांनी पोलिसांना निवेदन देत तत्काळ तपास करण्याचे निवेदन दिले होते. या कामी या संघटनेच्या पदाधिकार्यांकडून याचा पाठपुरावा केला गेला होता.
दोन दिवस भुईमुगाच्या शेंगावर
अपहरण नाट्याचा एक-एक धागा जसजसा जुळत गेला, तस-तसे पोलिसांनादेखील या घटनेचे गांभीर्य समजले. तब्बल सहा दिवस ओझर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव, किशोर अहिरराव, जितेंद्र बागूल, रावसाहेब मोरे, राजेंद्र डंबाळे, महिला पोलिस कर्मचारी उज्ज्वला पानसरे यांनी अहोरात्र मेहनत घेतली. या सार्या पथकाने दोन दिवस फक्त भुईमुगाच्या शेंगा खात मोहीम फत्ते केली.
मोबाईलच्या अमिषाने ओडले जाळ्यात
इयत्ता आठवीत शिकणार्या या अल्पवयीन मुलीस प्रियंका पाटील हिने उंची कपडे, महागडा मोबाइल यांचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढले. एका मुलीमागे तिला 20 हजार रुपये कमिशन मिळत होते. आपल्या कृत्याने चिमुकल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होतेय, याची काहीही पर्वा या प्रकरणात केली गेली नाही.