नाशिकच्या मुलीची मध्य प्रदेशात पावणेदोन लाखास विक्री, टोळी पोलिसांच्या हाती

नाशिकच्या मुलीची मध्य प्रदेशात पावणेदोन लाखास विक्री, टोळी पोलिसांच्या हाती
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या ओझरमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मध्य प्रदेशातील एका गावात अपहरणकर्त्यांनी पावणेदोन लाख रुपयांत विक्रीचा प्रकार ओझर पोलिसांनी उघडकीस आणला. यातून नाशिक जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींच्या अपहरणामागे मोठी टोळीच असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. ओझरच्या प्रकरणात अटक केलेल्या तीन महिला कमिशनवर काम करत असून, या टोळीचा मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. पोलिसांनी गेल्या पाच वर्षांतील अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची प्रकरणे पुन्हा तपासासाठी नव्याने हातात घेतली असून, यातून मुला-मुलींना पळविणारी मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील लखापूर (ता. भिकणगाव)मधून अपहृत अल्पवयीन मुलीची पोलिसांनी मोठ्या धाडसाने सुटका केली. या प्रकरणातील अपहरण करणार्‍या दोन महिलांसह तिची विक्री करणारी व विकत घेणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ओझर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 23 जुलैला 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका महिलेसह अपहृत मुलगी पायी जाताना दिसली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सातपूर परिसरातून संशयित महिला प्रियंका देवीदास पाटील (रा. कार्बन नाका) हिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता तिने शिरपूर येथील मैत्रीण संशयित रत्ना विक्रम कोळी हिच्या मदतीने मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी संशयित महिला रत्ना कोळीला शिरपूर (जि. धुळे)मधून ताब्यात घेतले. दोघींनी मिळून अपहृत मुलीस एक लाख 75 हजार रुपयांमध्ये गुजरात येथे लग्नासाठी विक्री केल्याचे प्रथम सांगितले. पोलिसांनी या दोघींसह त्यांची मध्य प्रदेशमध्ये लागेबांधे असलेल्या मुख्य दलाल महिला सुरेखाबाई जागो भिला (रा. शिरपूर) हिलाही पकडले.

दोन पथकांची गुजरात, मध्य प्रदेशात शोधमोहीम : पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून दोन पथके तयार केली. पोलिस निरीक्षक अशोक रहाटे, उपनिरीक्षक जी. ए. जाधव, महिला उपनिरीक्षक अर्चना तोडमल, हवालदार किशोर अहिरराव, विश्वनाथ धारबळ, अनुपम जाधव, रावसाहेब मोरे, राजेंद्र डंबाळे यांचे पथक गुजरातला रवाना केले. मात्र, तेथून मुलगी मध्य प्रदेशात नेल्याचे स्पष्ट झाल्याने पथक गुजरातमधून मध्य प्रदेशला गेले व तेथून मुलीची सुखरूप सुटका केली.

गुजरातमध्ये मुलीला विकण्यात आले, असे सांगून संशयित महिलांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. महिलांनी खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पथकाने गुजरातवरून थेट इंदूर गाठले. खरगोन जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांसोबत सचिन पाटील यांनी संपर्क साधत अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्याची मागणी केली. मध्य प्रदेश पोलिसांना सोबत घेत पोलिसांचे पथक लखापूर (ता. भिकणगाव) येथे गेले. तेथे विरोधाचा सामना करत मुलीला विकत घेणारे संशयित नानुराम येडू मनसारे व गोविंद नानुराम मनसारे यांना ताब्यात घेत मुलीची सुखरूप सुटका केली.

संशयितांची टोळी संघटित असून, तपास सुरू आहे. संशयितांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गेल्या पाच वर्षांतील मिसिंग प्रकरणांचा तपास सुरू आहे.
– सचिन पाटील,
पोलिस अधीक्षक,
नाशिक

मास्टरमाइंड रडारवर 

संशयितांचे धागेदोरे तपासण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. यापूर्वीदेखील संशयितांनी पंचवटी व सातपूर येथील काही मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे तपासात समोर येत आहे. संशयितांनी या प्रकारे शहरात व ग्रामीणमध्ये मुलींना फूस लावून अपहरण केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news