नाशिक जिल्ह्यात 12 लाख घरांवर फडकणार तिरंगा | पुढारी

नाशिक जिल्ह्यात 12 लाख घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विभागातील 38 लाख 51 हजार 651 घरांवर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 12 लाख 5 हजार 288 घरांवर तिरंगा फडकणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व यंत्रणांना केले आहे.

भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. विभागातील नागरी भागात एकूण 10 लाख 62 हजार 578 घरे आहेत. विभागातील ग्रामीण भागात एकूण 27 लाख 89 हजार 73 घरे आहेत. विभागीय आयुक्तालयातर्फे पाचही जिल्ह्यांना 7 लाख 66 हजार 369 झेंडे पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यांतर्गत नाशिक महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात 4 लाख 25 हजार 240 घरांची संख्या असून, तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील घरांची संख्या 7 लाख 80 हजार 48 इतकी असून, तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 9 लाख 5 हजार 288 झेंडे उपलब्ध होणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 3 लाख झेंडे पुरविले जाणार आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यात 8 लाख 99 हजार 666 घरांवर फडकणार तिरंगा फडकविण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यात 9 लाख 65 हजार 391; धुळ्यात 4 लाख 2 हजार 119 तसेच नंदुरबार जिल्ह्यात 3 लाख 79 हजार 187 घरांवर तिरंगा फडकविला जाईल. हर घर झेंडा हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा, असेही राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

24 तास फडकणार तिरंगा
भारतीय ध्वजसंहितेमध्ये डिसेंबर 2021 च्या आदेशान्वये काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पॉलिस्टर व यंत्राद्वारे तयार केलेले झेंडे लावण्यास परवानगी देण्यात आली. तसेच सदर अभियानामध्ये झेंडा फडकविल्यानंतर तो दिवस व रात्र 24 तास फडकविण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button