मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत ; मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा, मोठ्या घोषणांकडे लक्ष | पुढारी

मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत ; मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा, मोठ्या घोषणांकडे लक्ष

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतील अंतर्गत बंडात मंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ आमदार दादा भुसे यांनी केलेली पाठराखण मालेगावच्या विकासाला बूस्टर डोस देणारी ठरण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिंदे यांचा पहिला लक्षवेधी दौरा नाशिक जिल्ह्यात होत असून, त्याचे मुख्य केंद्र मालेगाव राहणार आहे. याप्रसंगी मालेगाव जिल्हानिर्मितीसह वळण योजनांचे रिटर्न गिफ्ट मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

कधीकाळी हिरे, साथी निहाल अहमद यांचे वर्चस्व असलेल्या मालेगावात सध्या भुसे पर्व सुरू आहे. दाभाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत, जिंकत भुसे यांची सुरू झालेली घोडदौड कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचली आहे. त्यात शिवसेनेतील महाभारतातून भुसे यांचे राजकीय वजन अधिकच वाढले आहे. त्यातूनच अनेक वर्षांनंतर मालेगावात मुख्यमंत्र्यांचा दौरा होत आहे. नगरविकास मंत्री असताना 100 कोटींच्या निधीची भेट देणारे शिंदे आता मुख्यमंत्री या नात्याने काय-काय देणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्याचे विभाजन अन् मालेगाव जिल्ह्याची निर्मितीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वप्रथम 1981 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीतील अजेंड्यात हा विषय परवलीचा ठरला. युती- आघाडी आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातही त्या-त्या वेळच्या नेत्यांनी या घोषणेचा पुनरुच्चार केला. 2013 मधील मालेगावातील पहिल्याच सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव अद्याप जिल्हा का झाला नाही, असा सवाल करीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करणार, असे वचन दिले होते. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आश्वासनपूर्ती होणार अशा आशा पल्लवीत झाल्या खर्‍या. मात्र, त्यांनाच आता पायउतार व्हावे लागल्याने पुन्हा विषय लांबणीवर पडणार, असे चित्र उभे राहिले. या दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेले शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांना गुरुबंधू दादा भुसे यांची असलेली साथ पाहता जिल्हानिर्मितीचा प्रश्न मार्गी लागण्याची घटिका अधिक समिप आल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी देण्यात आलेल्या अहवालात मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा या तालुक्यांचा समावेश होता. नंतर चांदवड, नांदगावचाही विषय पुढे आला. मनमाड, नामपूर तालुका निर्मितीचीही चाचपणी झाली. कळवणकरांचा विरोध राहिला. तर आता मालेगाव, बागलाण, देवळा आणि नांदगाव या तालुक्यांचा मालेगाव जिल्हानिर्मितीची शक्यता वर्तविली जात आहे. 2014 मध्ये आघाडी शासनाने एक समिती गठीत केली होती. त्यानुसार प्रशासकीय प्रक्रियेचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. याठिकाणी अपर जिल्हाधिकारी, अपर पोलिस अधीक्षक, न्यायालय, महापालिका, पंचायत समिती, सामान्य रुग्णालय अशी कार्यालये कार्यान्वित आहेत. जिल्हा मुख्यालयाच्या द़ृष्टीने सज्जता आहे. त्यास आता केवळ मूर्त रूप देण्याची औपचारिकता बाकी आहे. याविषयी सभेत मंत्री भुसे हे निवेदन सादर करणार आहेत. शिवाय प्रलंबित नार-पार वळण योजनेचाही आग्रह असेल. तेव्हा बाळासाहेबांची वचनपूर्ती करण्याची सधी शिंदे दवडणार नाहीत, असा मतप्रवाह आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा
मुख्यमंत्री शिंदे हे 30 तारखेला मालेगावात सभा घेणार आहेत. तत्पूर्वी, उत्तर महाराष्ट्राची प्रशासकीय आढावा बैठक होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंगळवारी (दि.26) मालेगावला भेट देऊन स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाची पाहणी केली. याच ठिकाणी आढावा बैठक घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शासकीय विश्रामगृहात महसूल, पोलिस आणि मनपा अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यास माजी मंत्री दादा भुसे यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button