नाशिक : रानभाजी महोत्सवातून आदिवासी संस्कृती जतन- विभागीय आयुक्त गमे | पुढारी

नाशिक : रानभाजी महोत्सवातून आदिवासी संस्कृती जतन- विभागीय आयुक्त गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रानभाज्या महोत्सवातून उत्पादक ते ग्राहक साखळी तयार होत असून, या माध्यमातून आदिवासी भागातील संस्कृती समोर आणण्याचे व जतन करण्याचे महत्त्वाचे काम होत आहे. या महोत्सवातून विविध रानभाज्यांबरोबर महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून आदिवासी भागातील स्वयंसहायता गटांना उत्पन्न मिळणार असून, रानभाज्यांचे संवर्धन होणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

आदिवासी भागात उपलब्ध होणार्‍या रसायनविरहित विषमुक्त रानभाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी म्हणून सलग तिसर्‍या वर्षी नाशिक जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून नाशिक पंचायत समितीच्या आवारात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या रानभाज्या महोत्सवाचे बुधवारी (दि.27) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आयुक्त (सेवा हमी कायदा) चित्रा कुलकर्णी, मुख्य लेखा वित्त अधिकारी महेश बच्छाव, प्रकल्प संचालक आनंद पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी रानभाज्या महोत्सवाची माहिती देताना सलग तिसर्‍या वर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक शुक्रवारी 10 ते 2 या वेळेत नाशिककरांना रानभाज्या खरेदी करता येणार आहेत.

या महोत्सवात प्रत्येक तालुक्यातील बचत गटांना सहभागी करून घेण्यात आले असून, आज 34 गटांनी यात सहभाग नोंदवला आहे. आदिवासी बांधवांना व महिला गटांना वस्तू विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महोत्सवात रानभाज्यांबरोबर बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नाशिक शहरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. रानभाज्या महोत्सव यशस्वी करण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

Back to top button