जळगाव : लाचखोर शिपायास रंगेहात अटक, तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई | पुढारी

जळगाव : लाचखोर शिपायास रंगेहात अटक, तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

जळगाव : निराधार महिलेस संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी २ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार या घटस्फोटीत असल्याने निराधार असून आपल्या आईसोबत त्या वास्तव्यास आहेत. शहरातील रेल्वे स्थानकाजवळ जळगाव तहसील कार्यालय असून तेथे शिपाई मगन गोबा भोई (रा. वाघ नगर, जळगाव) हे संजय गांधी योजनेचे फार्म जमा करतात. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी २७ जुलै रोजी त्यांच्याकडे आईचे काम करून ३ तीन हजार व तक्रारदाराचे काम करून २ दोन हजार मागितले होते. मात्र आधी तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी २ हजार मागितल्याने तक्रारदार महिलेनं लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी २७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सापळा रचून शिपाई मगन भोई याला रंगेहात अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुले, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, पोलिस कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टैबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button