धुळे : भाजप- शिवसेनेचा राडा, दोन पोलिस जखमी, गुन्हे दाखल | पुढारी

धुळे : भाजप- शिवसेनेचा राडा, दोन पोलिस जखमी, गुन्हे दाखल

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात स्वतंत्रपणे शासकीय कामात अडथळा आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलिस जखमी झाल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला आहे.

धुळे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. यातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर आंदोलने केले. धुळे शहरात मंत्री राणे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

ही अंत्ययात्रा गुरुशिष्य स्मारकाजवळ आली असता या चौकात भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाबाहेर गोळा झालेले भाजप कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी, शिवीगाळ तसेच दगडफेक करण्यात आली.

या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. आता याप्रकरणात रात्री उशिरा दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही तक्रारींमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

धुळे शहरात जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 अन्वये मनाई आदेश लागू असताना तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आदेश देण्यात आलेले होते.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी गोळा करुन घोषणाबाजी व दगडफेक केल्याने शासकीय कामात अडथळा झाला. तसेच कोरोना प्रतिबंधक कायद्याचादेखील भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दगडफेकीत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील व पोलिस कॉन्स्टेबल गुणवंत पाटील हे दोघे जखमी झाल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला आहे.

यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत भारतीय जनता पार्टीचे महापौर चंद्रकांत सोनार, महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, उपमहापौर भगवान गवळी, नगरसेवक प्रदीप कर्पे, भिकन वराडे, देवा सोनार , सिध्दार्थ बोरसे, प्रशांत बागुल, रोहीत चांदोडे, विकी परदेशी, नागसेन बोरसे आदींसह जमावाविरोधात भादंवी कलम 353, 332, 337, 143, 147, 148, 149, सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 सह साथरोग नियंत्रण अधिनियम कलम 3,4 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 52 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी तक्रार पोलिस हेड कॉन्स्टेबल भुषण खेडवण यांनी दिली असून या अंतर्गत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, युवा सेनेचे पंकज गोरे, सह संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, प्रफुल्ल पाटील, बबन थोरात, संजय गुजराथी , संजय जवराज, राजेंद्र पाटील, रविंद्र काकडे, संजय वाल्हे, चंद्रकांत म्हस्के, संदीप चव्हाण, संदीप सुर्यवंशी, यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात भादंवी कलम 353, 332, 337, 143, 147, 148, 149, सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 सह साथरोग नियंत्रण अधिनियम कलम 3,4 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 52 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button