नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य | पुढारी

नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या संकेतस्थळासह विभागीय कार्यालयांमध्ये मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन तथा निवडणूक विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने दिवाळीपूर्वीच निवडणुकांचा बार उडू शकतो.

एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता अंतिम मतदारयाद्यांकडे लागले आहे. नाशिक मनपा निवडणुकीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्यांवर 3,847 इतक्या हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींमध्ये सर्वाधिक हरकती या मतदारांच्या प्रभाग अदलाबदलीबाबत होत्या. सर्वाधिक 2,433 हरकती या सिडको विभागातील होत्या. नाशिक पश्चिममधून 46 इतक्या सर्वात कमी हरकती होत्या. एक एका प्रभागातील जवळपास दोन ते पाच हजार आणि त्याहूनही अधिक मतदारांची अदलाबदली झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

हरकतींची बाब आयुक्त रमेश पवार यांनी गांभिर्याने घेत सर्व विभागीय अधिकारी, नोडल अधिकारी, पर्यवेक्षक, यादीप्रमुख, यादी सहायक अशा सर्व कर्मचार्‍यांना स्थळ पाहणी तसेच संबंधित हरकतदारांच्या भेटी घेऊन चुका दुरुस्तीचे निर्देश दिले होते.

हरकतींवरील चुका दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर असल्याने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्याकरता राज्य निवडणूक आयोगाने दोन वेळा मुदतवाढ देत 21 जुलै ही तारीख अंतिम केली होती. त्यानुसार आता नाशिकसह पिंपरी-चिंचवड आणि पुणे या तीन महापालिकांना अंतिम मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी 21 पर्यंत मुदतवाढ दिली होती.

विभागनिहाय हरकतींची संख्या
पूर्व 244
पश्चिम 46
पंचवटी 396
नाशिकरोड 222
सिडको 2433
सातपूर 155
ट्रू व्होटर्स अ‍ॅप 352
एकूण हरकती 3, 847

हेही वाचा :

Back to top button