Nashik : उंबरदरी धरण तुडुंब भरले ; सिन्नर तालुक्यात ‘इतका’ पाऊस | पुढारी

Nashik : उंबरदरी धरण तुडुंब भरले ; सिन्नर तालुक्यात 'इतका' पाऊस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या तीन-चार दिवसांपासून म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानी विश्रामगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दोन दिवसांपासून नदीला काहीसा पूर आहे. उंबरदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने कोनांबे, बोरखिंडपाठोपाठ उंबरदरी धरण तुडुंब भरले आहे. या धरणाची 51.92 दलघफू एवढी साठवण क्षमता आहे. तालुक्यात बुधवार (दि.13)पर्यंत सरासरी पावसाची 226 मिमी नोंद झाली आहे.

धरण काठोकाठ भरल्याने ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेला संजीवनी मिळाली असून, परिसरातील पाच गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. शेतकर्‍यांमध्येदेखील समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हाळुंगी नदीला पूर आल्याने केळी रस्त्यावरील पुलाला पाणी लागले. पूर पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र होते. म्हाळुंगी नदीवर असलेले सर्व बंधारे भरून म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे पाण्याची आवक वाढली.

सोमवारपर्यंत नांदूरशिंगोटे परिसरात 251, तर भोजापूर खोर्‍यात 113 मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. धरण भरण्यासाठी आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम रहावा, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

Back to top button