नाशिक : तांदळात आढळले किडे आणि खडे, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती | पुढारी

नाशिक : तांदळात आढळले किडे आणि खडे, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाकडून पुरविण्यात येणार्‍या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर किडे आणि खडे आढळून येत असल्याने शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या बाबींची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम हे या चौकशी समितीचे अध्यक्ष असतील, तर जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार योजनेचे लेखाधिकारी श्रीधर देवरे सदस्य, तर नाशिक मनपाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. सिडकोतील डॉ. डी. एस. आहेर प्राथमिक शाळेत पोषण आहारात अळी आढळून आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पुरवठा करण्यात येणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारी तसेच पोषण आहारात आढळून येणार्‍या किड्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या शिक्षण संचालनालयाने त्रिसदस्यीय समिती गठीत करून या घटनेची तसेच निकृष्ट तांदळाची तपासणी करण्याचे आदेश समितीला दिले आहेत. चौकशी समितीने दि. 15 जुलै रोजी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर पाटील यांनी समितीला दिले आहेत.

‘त्या’ ठेकेदाराला पुन्हा मोकळीक
कोरोना काळाआधी जवळपास दीड ते दोन वर्षे ठेकेदारांकडून आहारपुरवठा करण्यात आला. त्यावेळी एकाही संस्थेने कधी खराब तांदळाबाबत तक्रार केली नाही. परंतु, आता ठेकेदारांकडूनच तक्रारी वाढल्याने यात नेमके काय काळेबेरे आहे, याचा शोध समितीने घेणे गरजेचे आहे. मध्यंतरी पंचवटीतील एका ठेकेदाराकडे शासनाचा सुमारे 14 हजार किलो तांदूळ आढळून आला होता. त्यासंदर्भातही चौकशी समिती नेमली. अहवाल सादर करण्यात आला. मात्र, पुढे कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे एक प्रकारे संबंधित ठेकेदाराला शासनाकडूनच मोकळीक देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

शासनाच्या तांदळाची विक्री
दरम्यान, शासनाकडून शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणार्‍या ठेकेदारांना तांदळाचा पुरवठा केला जातो. मात्र, पुरवठा करण्यात आलेला तांदूळ ठेकेदारांकडून शिजवला न जाता, तो बाहेर मार्केटमध्ये जादा दरात विकला जातो आणि त्याहून खराब असलेला तांदूळ शिजवण्याकरिता विकत घेतला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे शासनाने नेमलेल्या समितीच्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

Back to top button