Ashadi Ekadashi : चोखा म्हणे देवे देखिला पंढरी ; भक्तिरसात नाशिककर चिंब | पुढारी

Ashadi Ekadashi : चोखा म्हणे देवे देखिला पंढरी ; भक्तिरसात नाशिककर चिंब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चोखा म्हणे देवे देखिला पंढरी; उभा भीमातीरी
विटेवरी विठ्ठल, विठ्ठल गजरी; अवघी दुमदुमली पंढरी
संत चोखामेळा यांनी त्यांच्या अभंगात विठ्ठलाचे गुणगान गायले आहे. ‘विठ्ठल-विठ्ठल जयहरी’, ‘पुंडलिक वर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय’ चा घोष आणि जोडीला पावसाची संततधार अशा भक्तिमय वातावरणात रविवारी (दि. 10) नाशिकमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला.

दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर नाशिकमध्ये आषाढी एकादशीसाठी उत्साह पाहायला मिळाला. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर रविवारी (दि. 10) निर्बंधमुक्त आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. त्यामुळे विठ्ठलभक्तांमध्ये उत्साह संचारला. जुने नाशिक, पंचवटी परिसर, कॉलेजरोड, सातपूर, नाशिकरोड आदी भागांमधील विठ्ठल मंदिरांमध्ये पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर विहितगाव येथील प्रतिपंढरपूर असलेल्या विठ्ठल मंदिरातही श्रींचा महाभिषेक, महाआरती व अन्य कार्यक्रम पार पडले. ठिकठिकाणी भजन व कीर्तन सोहळ्यासह पालखी सोहळेही काढण्यात आले.

लाडक्या विठूरायाचे लोभस रूप डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये एकच गर्दी केली होती, तर आषाढीच्या निमित्ताने प्रसादविक्रेत्यांसह अन्य छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी मंदिर परिसरात दुकाने थाटल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

महाप्रसादाचे वितरण
आषाढीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व धार्मिक संस्था तसेच निरनिराळ्या मित्रमंडळांतर्फे विठ्ठल मंदिर परिसरात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. साबुदाणा खिचडी, केळी, राजगिरा लाडू व उपवासाची अन्य पदार्थ घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

हेही वाचा :

Back to top button