नाशिक : एटीएमचा स्क्रीन बंद पाडत घातली बँकांना टोपी ; एकच पिन क्रमांकाच्या 56 कार्डचा वापर | पुढारी

नाशिक : एटीएमचा स्क्रीन बंद पाडत घातली बँकांना टोपी ; एकच पिन क्रमांकाच्या 56 कार्डचा वापर

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
चोरटे चोरीसाठी नवनवीन प्रकार शोधत असतात. असाच नवीन प्रकार सातपूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सातपूर पोलिसांनी पकडलेल्या परराज्यीय टोळीने एकच पिन नंबर असलेले 56 एटीएम कार्ड वापरून अनेक बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणला. या टोळीतील चौघा संशयितांची सातपूर पोलिस चौकशी करत आहेत. या फसवणुकीत ही टोळी बँकेचे एटीएमच बंद पाडून खोट्या ऑनलाइन तक्रारीद्वारे बँकेकडून पैसे वसूल करत असे.

सातपूर येथील अशोकनगर परिसरात युनियन बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये छेडछाड होत असल्याचा संदेश बँकेला प्राप्त झाला. बँकेने ही माहिती तत्काळ सातपूर पोलिसांना कळवताच सातपूर पोलिसांचे पथक सातपूर येथील पपया नर्सरीजवळील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमजवळ पोहोचले. तेथेे दोन व्यक्ती संशयितरीत्या हालचाल करताना दिसल्या. एक व्यक्ती एटीएममध्ये होती तर दुसरी व्यक्ती बाहेर उभी होती. या दोघांचा संशय आल्याने पोलिस उपनिरीक्षक वाघ यांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता, हे दोघेही हिंदी भाषिक असल्याचे लक्षात आले. एटीएमला येण्याचे समाधानकारक कारण त्यांना देता आले नाही. परंतु, त्यांच्या चौकशीतून फसवणूक करण्याची धक्कादायक पद्धत उघड झाली आणि पोलिसही आश्चर्यचकीत झाले. सातपूर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.

या संशयितांकडून वेगवेगळ्या बँकांचे एकूण 56 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. या सर्व एटीएम कार्डचा पिन नंबर एकच असल्याचे तपासात पुढे आले. तसेच या संशयित आरोपींनी अनेक ठिकाणी जात बँकांची फसवणूक केल्याची माहिती प्राप्त झाली. बँकांकडून पोलिसांनी लेखी माहिती मागविली असून, अन्य एटीएम कार्डधारकही यात सहभागी आहेत का? याचा पोलिस तपास करत आहेत.

ही टोळी एटीएममधून नोटा बाहेर येताच, लगेच एटीएमचा डिस्प्ले जोरात ओढत आणि एटीएमचे नुकसान करून आतील यंत्र तत्काळ चालू-बंद करत. एटीएमच्या बाहेर आलेल्या नोटा यंत्र बंद असताना काढून घेत आणि पैसे न मिळाल्याची ऑनलाइन तक्रार संबंधित बँकेत दाखल करत पैसे वसूल करून घेत. बँक एटीएमच्या कार्यशैलीतील त्रुटीचे रूपांतर तांत्रिक घोळात ते करत आणि त्यामुळे बँकेलाही ही बाब लवकर लक्षात येत नसे. टोळीच्या खात्यावर बँक पैसे पुन्हा वर्ग करत. ही नामी शक्कल वापरत त्यांनी अनेक बँकांना हजारो रुपयांना टोपी घातल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा :

Back to top button