नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी | पुढारी

नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला, तरी हा ऋतू अनेक आजारही सोबत घेऊन येत असतो. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांनी रुग्णालये भरली होती. आता सर्दी-खोकल्याची समस्या वाढली असून, घरोघरी सर्दी-खोकल्याचे रुग्ण आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये या तक्रारी सर्वाधिक असून, दूषित पाणी, अस्वच्छता, थंड वातावरण आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन हे या मागील कारणे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जमिनीवर साचणार्‍या दूषित पाण्यामुळे आजार पसरत असतात. या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणार्‍या आजारांबरोबरच सर्दी, खोकला-पडसे यांसारख्या आजारांचाही मोठा धोका असतो. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखे अनेक आजार उद्भवण्याची भीती आहे. पावसाळ्यात पचनक्रिया मंदावत असल्याने, रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. अशात संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची दाट शक्यता असते. याव्यतिरिक्त त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोरायसिस यांसारखे विकारही उद्भवू शकतात. सध्या ताप, सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. ही सर्व लक्षणे कोरोनाची असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे आवश्यक आहे.

तसेच पावसात श्वसनविकाराची, समस्या बळावते. पावसाळ्यात ताप, सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढतात. ही सर्व कोरोनाची लक्षणे आहेत. हे आजार टाळायचे असल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे हा एकमेव पर्याय आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्यात दूषित पाण्याची मोठी समस्या असल्याने, शक्यतो पाणी गरम करून थंड केलेले स्वच्छ पाणी प्यावे, असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.

शाळेतील हजेरी निम्म्यावर
शाळेत एकापासून दुसर्‍याला सर्दी-खोकल्याची लागण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून वर्गातील हजेरी निम्म्यावर आली आहे. अशात पालकांनी आपल्या पाल्यांबाबत पुरेशी काळजी बाळगायला हवी. सर्दी-खोकला असल्यास शाळेत पाठविणे टाळावे.

डेंग्यू, मलेरियाची भीती
गेल्या दोन वर्षांपासून डेंग्यू, मलेरियाचे फारसे रुग्ण आढळून आले नाहीत. मात्र, या आजारांचा पूर्वेतिहास बघितल्यास वर्षाआड हे आजार डोके वर काढतात. नागरिकांनी पुरेशी दक्षता घ्यावी.

सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी. सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास अंगावर काढू नये. दूषित पाणी, उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळावे. तसेच डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा.
– डॉ. अमोल मुरकुटे, बालरोगतज्ज्ञ

हेही वाचा :

Back to top button