Chhagan Bhujbal : सत्ता बदलली, तरी येवल्याचा विकास थांबू देणार नाही | पुढारी

Chhagan Bhujbal : सत्ता बदलली, तरी येवल्याचा विकास थांबू देणार नाही

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सत्ता असली काय आणि नसली काय, येवलेकरांचे प्रेम आमच्यावर नेहमी आहे. ते कधी तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. सत्ता बदलली, तरी मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो, या येवल्याचा विकास मी कधीही थांबू देणार नाही. राज्यात कितीही सत्तांतर झाले, तरी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघ हा किती मजबुतीने उभा राहील, हे आपण सर्वांना दाखवून देऊ, असे सांगत नाशिक जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राधाकृष्ण लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, अरुण थोरात, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, संजय बनकर, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, शहराध्यक्ष दीपक लोणारी, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, अ‍ॅड. बाबासाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, बाळासाहेब गुंड, भाऊसाहेब भवर, प्रकाश वाघ, मोहन शेलार, सचिन कळमकर, राजश्री पहिलवान, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. श्रीकांत आवारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असे सांगत नव्याने स्थापन झालेले सरकार किती दिवस कार्यरत राहील, हे म्हणण्यापेक्षा नांदा सौख्य भरे, अशा शुभेच्छा देत त्यांनी चिमटा काढला.

ते म्हणाले की, नव्याने स्थापन झालेल्या सरकारने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिली. मी, लोकप्रतिनिधींना समप्रमाणात निधी द्या, त्यांच्या मागण्यांनुसार कामे करा, असे आदेश दिले होते. नाशिकच्या विकासाला खीळ बसू नये म्हणून मी ऑनलाइन बैठका घेतल्या आणि जनतेची कामे थांबू नये, असे आदेश दिले होते. आता केवळ नाशिक जिल्ह्यात नाही, तर राज्यातील जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. येत्या काळात आपण मंजूर केलेली कामे पूर्ण होतील. त्यातील कुठलेही काम रद्द होणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

ते म्हणाले की, आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करायचे आहे. प्रत्येक तालुका, शहर, गावे, बूथ कमिट्या मजबूत करून सर्व कार्यकारिणी सक्रिय करा. नाशिक जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, बाजार समित्या यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना जरी अडचणीत आली असली, तरी महाविकास आघाडी सरकारमधील घटक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

कहाँ ढुंढे सबका साथ, सबका विकास…
ते म्हणाले की, कांद्याला मिळत असलेल्या सध्याच्या भावामुळे उत्पादन खर्च निघणे कठीण आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. घरगुती सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. केंद्र शासनाच्या धोरणामुळे खतांच्या व बियाण्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत असल्याचे सांगत ‘कहाँ ढुंढे सबका साथ, सबका विकास, कोई बता नही रहा, कब होगी महंगाई पर मात’ या शायरीद्वारे सरकारवर टीका केली.

हेही वाचा :

Back to top button