नाशिक : संपत्तीच्या वादातून ड्रायव्हरसह सेवेकऱ्यांनी मिळून केली हत्या, अफगाण धर्मगुरूच्या खुनाचा छडा | पुढारी

नाशिक : संपत्तीच्या वादातून ड्रायव्हरसह सेवेकऱ्यांनी मिळून केली हत्या, अफगाण धर्मगुरूच्या खुनाचा छडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येवला येथील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत अफगाणच्या निर्वासित सुफी धर्मगुरुवर मंगळवारी (दि.५) गोळी झाडण्यात आली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून संपत्तीच्या वादातून चालकासह, सेवेकऱ्यांनी मिळून धर्मगुरुचा खुन केल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती उर्फ जरीफ बाबा (३५) असे या अफगाणच्या निर्वासिताचे नाव आहे. पोलिस अधीक्षक सचीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीफ बाबा हे सुफी धर्मगुरु म्हणून ओळखले जात होते. जरीफ हे सुमारे चार वर्षांपूर्वी भारतात आले व त्यांनी दिल्ली, कर्नाटक येथे काही काळ वास्तव्य केले. त्यानंतर ते जिल्ह्यातील वावी येथे राहत होते. त्यांनी सुफी परंपरेने पुजा विधी करून स्वत:ची ओळख वाढवली. सोशल मीडिया, भक्तांकडून मिळणारी देणगी यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. जरीफ हे निर्वासित असल्याने त्यांना भारतात मालमत्ता विकत घेता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांचे चालक, सेवेकरी व विश्वासू लोकांच्या नावाने अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे समोर येत आहे. गेल्या तीन ते चार वर्षात जरीफ यांनी इतरांच्या नावे सुमारे तीन कोटी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांच्याकडील चारचाकी वाहनही त्यांच्या चालकाच्या नावे खरेदी केले आहे. संपत्ती बळकावण्याच्या हेतूने मारेकऱ्यांनी जरीफ यांचा खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मंगळवारी सकाळी वावी येथून जरीफ हे सहकाऱ्यांसोबत येवला येथे आले. तेथे काही ठिकाणी पूजा विधी केल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांना चिंचोडी एमआयडीसी येथे जागेची पूजा करण्यासाठी नेले. पुजा केल्यानंतर जरीफ यांना मारेकऱ्याने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर मारेकरी वाहनाने पसार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून एकास ताब्यात घेतले आहे. संशयित मारेकरी हे परराज्यातील असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासात जरीफ यांचा खून चालकासह इतर दोघांनी केल्याचे उघड झाले.

जरीफ चिश्ती हे निर्वासित म्हणून वावी येथे राहत होते. त्यांनी सहकाऱ्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्याचे समाेर आले आहे. सोशल मीडिया व देणग्यांमार्फत त्यांना पैसे मिळत होते. त्यामुळे संपत्तीच्या वादातून सहकाऱ्यांनी त्यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संशयित मारेकऱ्यांना लवकरच पकडले जाईल. त्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होईल.
सचीन पाटील, पोलिस अधीक्षक.

Back to top button