नाशिक : कारची दुचाकीला धडक; दोघा मित्रांचा मृत्‍यू | पुढारी

नाशिक : कारची दुचाकीला धडक; दोघा मित्रांचा मृत्‍यू

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा: नाशिक – पुणे महामार्गावर येथील हॉटेल शाहूसमोर कारची दुचाकीला धडक बसून झालेल्‍या अपघातात  दोघे मित्र ठार झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.20) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडला.  साजन भगवान वायचळे (२४) आणि सचिन किसन गोळेसर (२३, दोघे रा. कुंदेवाडी, ता. सिन्नर) अशी मृतांची नावे आहेत.

मित्राच्‍या वाढदिवसाला जाताना काळाचा घाला

साजन आणि सचिन हे एका मित्राचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर मोटारसायकलने (एमएच 15 इएन 1450) ते उद्योगभवन परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होते.

गतिरोधक असल्याने मोटारसायकलचा वेग कमी केला. तथापि मागील बाजूने भरधाव येणाऱ्या कारने (एमएच 15 इ 7580) मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

त्यात दोघेही शंभर फुटांपेक्षा अधिक अंतरावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू

उपचारापूर्वीच दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्विफ्ट कारचालक जखमी झाला असून त्याला नाशिक येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

साजन वायचळे हा मुसळगाव येथील औद्योगिक सहकारी वसाहतीतील प्रसिद्ध हॉटेल अंबिका खानावळचे मालक भगवान वायचळे यांचा मुलगा होता.

सचिन गोळेसर हा कुंदेवाडी येथील कीर्तनकार हभप एकनाथ महाराज गोळेसर यांचा पुतण्या होता.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार परदेशी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपने राज्यभर खळबळ

Back to top button