जळगाव : महिला पोलिसाची बदनामी करणारा निघाला पोलिस! | पुढारी

जळगाव : महिला पोलिसाची बदनामी करणारा निघाला पोलिस!

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा :  शहरातील पोलिस मुख्यालयात असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या नावे काही दिवसांपूर्वी पोलिस आणि पत्रकारांना अश्लील मेसेज पाठविण्यात आले होते. महिला पोलिसाची बदनामी प्रकरणी सायबर शाखेत या प्रकरणी दाखल असलेल्या तक्रारीवरून तपासाअंती पोलिसांनी मुख्यालयातच कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

महिला पोलीसाची बदनामी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला पोलीस कर्मचारी हा सायबर शाखेत कार्यरत आहे. त्यानेच गुन्हा केल्याचे उघडीस आल्याने पोलीस यंत्रणेमधील विश्‍वाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत

पोलिस मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्याच्या नावे काही दिवसांपूर्वी मुख्यालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व काही पत्रकारांना अश्लील मेसेज पाठविण्यात आले होते. या प्रकरणी संबंधित महिलेने सायबर शाखेत तक्रार दाखल केली होती.

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी या प्रकरणी तपासाच्या सूचना केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे लोकेशन नाशिक मिळून आले होते.

सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांच्या पथकाने मेसेज केलेल्या मोबाईलचे लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरचा कर्मचारी अनेक वर्षांपासून या शाखेत काम करीत आहे. त्याच शाखेच्या  कर्मचाऱ्याने हे काम  केल्याचे उघड झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

नरेंद्र पाटील हे पोलीस मुख्यालयात अनेक वर्षापासून कार्यरत आहेत.

पोलीस मुख्यालयातील काही तांत्रिक शाखा, वाचक शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेशी निगडित असलेल्या शाखांमध्ये काही कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत आहेत.

बदलीच्या वेळी तात्पुरती एखाद्या पोलीस ठाण्यात बदली दाखवून त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयातील शाखेत संलग्नित केले जाते.

या शाखेतील काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सलगी करून त्यांची मर्जी जिंकून घेतात.

जिल्हाभरातील पोलीस ठाणे आणि कर्मचाऱ्यांबद्दल ते अधिकाऱ्यांना माहिती पुरवीत असल्याने अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालत त्याच ठिकाणी नेमणूक देतात, अशी चर्चा पाेलिस दलात चर्चा आहे.

Back to top button