नाशिक : महापालिकेला करसवलत पावली ; तीन महिन्यांत इतक्या कोटींचा महसूल वसूल | पुढारी

नाशिक : महापालिकेला करसवलत पावली ; तीन महिन्यांत इतक्या कोटींचा महसूल वसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेने नियमित करदात्यांसाठी जाहीर केलेल्या करसवलत योजनेतून आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच महापालिकेला विक्रमी 71 कोटी 42 लाख महसूल मिळाला. या योजनेचा एक लाख 90 हजार 34 मिळकतधारांनी लाभ घेतला. गेल्या वर्षापेक्षा 44 कोटी जादा वसूल झाले.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत महापालिकेला अपेक्षित महसूलप्राप्ती झालेली नाही. नागरिकांनी घरपट्टी-पाणीपट्टी भरण्याकडे पाठ फिरवल्याने त्याचा मनपाला मोठा फटका सहन करावा लागला. थकबाकीचा डोंगर आता 350 कोटींहून अधिक आहे. पुरेशी वसुली होऊन मनपाच्या तिजोरीत महसूल प्राप्त होण्याकरता महापालिकेने करसवलत योजना लागू करून नियमित कर भरणार्‍या मालमत्ताधारकांना दिलासा आणि दुसरीकडे मनपाचा महसूल मिळण्याचा मार्गही मोकळा करून घेतला.

घरपट्टी आगाऊ भरणा करणार्‍यांना आवाहन करण्यात आले. त्यानुसार वार्षिक कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास एप्रिलमध्ये पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के, तर जून महिन्यात दोन टक्के सवलत जाहीर करण्यात आली. तसेच ऑनलाइन करभरणा केल्यास अतिरिक्त एक टक्का व अधिकाधिक एक हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली. गेल्या तीन महिन्यांत 71 कोटी 42 लाखांची घरपट्टी जमा झाली.

असा जमा झाला तिजोरीत कर
करसवलत योजनेंतर्गत एप्रिल महिन्यात पाच टक्के करसवलतीतून मनपाला 27 कोटी मिळाले. मे महिन्यात तीन टक्के सवलतीमुळे 26 कोटी, तर जून महि:न्यात दोन टक्के करसवलत देऊन 19 कोटींचा कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला.

हेही वाचा :

Back to top button