Nashik : गंगापूर धरणानजीकच्या नागलवाडीतून बिबट्या जेरबंद | पुढारी

Nashik : गंगापूर धरणानजीकच्या नागलवाडीतून बिबट्या जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर धरणाच्या कुशीतील नागलवाडी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात गुरुवारी (दि.30) पहाटे नरबिबट्या अलगद अडकला. गेल्या तीन महिन्यांत गंगापूर शिवारातून अर्ध्या डझनपेक्षा जास्त बिबट्यांना यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गंगापूर धरण परिसर, गिरणारे, वाडगाव, दुगाव परिसरात बिबट्याचे भरदिवसा दर्शन होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. नागलवाडी शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांच्या मळ्यात लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात बिबट्या अडकला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला पिंजर्‍यासह गंगापूर येथील रोपवाटिकेत हलविले. जेरबंद बिबट्याचे वय अंदाजे 3 ते 4 वर्षे इतके असून, वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवास सोडण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी दिली.

एमआयडीसीत बिबट्याचे दर्शन
गेल्या आठवड्यात सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याचे दर्शन झाले होते. त्या बिबट्याने अद्यापही एमआयडीसीतच ठाण मांडल्याचे विविध कंपन्यांतील सीसीटीव्हीच्या फुटेजमधून समोर आले आहे. बिबट्याच्या दर्शनाने कामगारवर्गात दहशतीचे वातावरण आहे.

हेही वाचा :

Back to top button