Nashik Crime : बापलेकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी | पुढारी

Nashik Crime : बापलेकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पूर्व वैमनस्यातून बापलेकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी बागवानपुऱ्यातील तीघांना दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. द्वारका परिसरात नोव्हेंबर २०१८ मध्ये द्वारका हा प्रकार घडला होता.

विक्रम उर्फ पप्पू रूपचंद तसांबड (३०), पिंटू उर्फ प्रदिप परशराम तसाबंड (२५) व संदेश उर्फ सोनू प्रकाश साळवे (२७ रा.तिघे महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत. याप्रकरणी सिध्दार्थ सुरेश दलोड (२५ रा.सिध्दार्थ बिल्डींग,महालक्ष्मी चाळ) या युवकाने फिर्याद दाखल केली होती. सिध्दार्थ दलोड व सुरेश दलोड हे पितापुत्र दि. १८ नोव्हेंबर २०१८ रोजी द्वारका परिसरातील गोदावरी हॉटेल पाठीमागील मीरकर कॉम्प्लेक्स येथे असतांना, संशयितांनी त्यांना गाठून जुन्या वादाची कुरापत काढून दलोड पितापुत्रावर धारदार चॉपरने हल्ला केला होता. यावेळी सिद्दार्थ दलोड यांचा आतेभाऊ सौरभ बागडी हा त्यांच्या मदतीला धावून आला असता त्यालाही संशयितांनी फायटरने मारहाण करून जखमी केले होते.
याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक एम.जी.वराळ यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारतर्फे अ‍ॅड. सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. फिर्यादी पंच आणि साक्षीदार यांनी दिलेली साक्ष व तपास अधिकाऱ्यानी सादर केलेले पुराव्यांच्या आधारे जिल्हा न्यायाधीश तथा अपर सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी तिघा आरोपींना दहा वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

Back to top button