नाशिक शहरात ‘स्वाइन फ्लू’चा प्रादुर्भाव ; पिता-पुत्रास संसर्ग | पुढारी

नाशिक शहरात ‘स्वाइन फ्लू’चा प्रादुर्भाव ; पिता-पुत्रास संसर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारी आणि डेंग्यू या संसर्गजन्य आजारांपाठोपाठ नाशिक शहरामध्ये आता स्वाइन फ्लूचाही प्रादुर्भाव झाला आहे. दीड वर्षानंतर स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, पाथर्डी फाटा येथील पिता-पुत्रास या आजाराची लागण झाली आहे. या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे.

तिसर्‍या लाटेनंतर कोरोनाचे पुन्हा एकदा रुग्ण आढळून येत असून, बुधवारी (दि. 29) एकाच दिवशी कोरोनाचे 48 नवे रुग्ण आढळले. कोरोनापाठोपाठ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, गेल्या पंधरवड्यात शहरातील 10 जणांना डेंग्यूची लागण झाली. आता स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून, पाथर्डी फाटा परिसरातील 34 वर्षीय व्यक्तीला स्वाइन फ्लूचे निदान झाले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाविषयी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला माहिती मिळाल्यानंतर तत्काळ मनपाच्या वैद्यकीय पथकाने रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत रुग्णाच्या 64 वर्षीय वडिलांना स्वाइनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना लक्षणे नसल्याने विलगीकरणात ठेवलेले आहे.

शहरात दीड वर्षात
एकही नोंद नाही
2017 मध्ये नाशिक शहरात स्वाइन फ्लूचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. 264 जणांना या आजाराची लागण झाली होती. 2018 मध्ये 241 रुग्ण, 2019 मध्ये 178 रुग्ण, तर 2020 मध्ये सहा जणांना या आजाराची बाधा झाली होती. 2021 मध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने आणि कोरोना व स्वाइन फ्लूची लक्षणे सारखीच असल्यामुळे स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र चाचण्या करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळेच गेल्या दीड वर्षात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंदच झालेली नाही.

हेही वाचा  :

Back to top button