नाशिक मनपा : प्रारूप मतदारयाद्यांवर 3 जुलैपर्यंत घेता येणार हरकती | पुढारी

नाशिक मनपा : प्रारूप मतदारयाद्यांवर 3 जुलैपर्यंत घेता येणार हरकती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रारूप मतदारयाद्यांमधील गोंधळ आणि संकेतस्थळावर याद्या अपलोड करण्यास विलंब झाल्यामुळे मतदारयाद्यांवर हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवारांकडून केली जात आहे. ही मागणी राज्य निवडणूक आयोगाने मान्य केल्याने आता दि. 1 जुलैऐवजी 3 जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.

दरम्यान, तिसर्‍या दिवशी हरकतींची संख्या 275 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर मतदारयाद्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याने हरकतींकरता 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली आहे. मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यापूर्वी झालेल्या तांत्रिक चुकीमुळे याद्या संकेतस्थळावर उशिराने प्रसिद्ध करण्यात आल्या. तीस तासांच्या प्रतीक्षेनंतर याद्या संकेतस्थळावर अपलोड झाल्या. परंतु, या याद्यांमध्ये अनेक चुका असल्याने सर्वच इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधी विलंब त्यात 1 जुलैपर्यंतच हरकती दाखल करण्यासाठी वेळ असल्याने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. याबाबत नाशिक महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये हरकतींसाठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. रविवारी आणि शनिवारी या सुटीच्या दिवशीदेखील हरकती दाखल करता येणार आहे.

मुदतवाढीसाठी शिवसेनेची मागणी
दोन दिवस दिलेली मुदतवाढ न देता पंधरा दिवसांची मुदतवाढ आयोगाने द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांमार्फत निवडणूक आयोगाकडे केली आहे. महापालिकेने प्रभाग रचनेनुसार केलेले जनगणनेचे ब्लॉक उपलब्ध असूनही प्रभागनिहाय मतदारयाद्यांमध्ये चुका झाल्याची बाब शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निदर्शनास आणून दिली आहे. याद्यांतील दुरुस्ती तसेच हरकती नोंदविण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, नाना पाटील, संदीप लभडे यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button