Jalgaon : नशिराबादजवळ ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात ; पाच जण जागीच ठार | पुढारी

Jalgaon : नशिराबादजवळ ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात ; पाच जण जागीच ठार

जळगाव : भरधाव ट्रकने दोन पिकअप वाहनांना उडवल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात नशिराबाद टोलनाक्याजवळ बुधवारी (दि. २९) पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडला. पहाटेच्या सुमारास ट्रक चालकाला आलेल्या झोपेमुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नशिराबाद पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रीत केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी फैजपूर येथे गुरांचा बाजार भरतो. याठिकाणी जळगाव येथून बकर्‍या घेवून बोलेरो पीकअप वाहन (क्रमांक एम.एच. ४३ ए.डी. १०५१) व (एम.एच.४३ बी.बी.००५०) हे दोन्ही वाहने भुसावळच्या दिशेने जात असताना समोरून येणार्‍या भरधाव ट्रक (क्रमांक एम.एच.०९ एच.जी.९५२१) ने दोन्ही वाहनांना धडक दिली. अपघातानंतर ट्रक उड्डाणपुलावरील पिलरला धडकला तर दोन्ही पिकअप वाहनांचा चक्काचूर झाला तर ट्रकच्या प्रचंड धडकेने बोलेरो वाहनातील प्रवासी पुलाखाली फेकले गेल्याने जबर मार लागून चौघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर पोलिस प्रशासनाची धाव
अपघाताची माहिती मिळताच नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक किरण मोरे, उपनिरीक्षक राजू साळुंखे, महामार्ग वाहतूक पोलिस विभागाचे सहाय्यक निरीक्षक सुनील मेढे, उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, किरण हिवराळे, अनिल सपकाळे, पवन देशमुख, हितेश पाटील, दीपक पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गोदावरी रुग्णालयात हलविले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Back to top button