नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेत सुरू असलेल्या बंडाळीमुळे राजकीय चित्र अस्थिर झाले असून, या प्रकरणाचा निपटारा होत नसल्याने शिवसैनिक तसेच पदाधिकारीही विचलित झाले आहेत. त्यामुळेच हे बंड शमविण्यासाठी आता शिवसेना पदाधिकारीही सक्रिय झाले असून, नाशिकमधील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे.
शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांनी शिंदे यांना भावनिक साद घालत 'तुमच्या स्वाभिमानाच्या भांडणात सामान्य शिवसैनिक मरतो आहे. त्याची परवड होत असून, तुम्ही पक्ष सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव ठाकरे यांना समजावून सांगतो,' असे पत्र लिहिले आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले. शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बंडाबाबत सामान्य शिवसैनिक भावना व्यक्त करत बंडखोरांना परत येण्याचे आवाहन करत आहे. उपनेते बागूल यांनीही एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून सामान्य शिवसैनिकांची सुरू असलेली होरपळ व्यक्त केली. तुम्ही म्हणता, आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. हिंदुत्ववादी आहोत. मग अडचण काय? सुरत आणि गुवाहाटीत राहून काय करता. मुंबईला या, पक्ष सोडू नका, आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समजावून सांगतो, असे पत्रात म्हटले आहे. तुम्हाला शिवसेना पाहिजे. उद्धवजींना तुम्ही पाहिजे आणि तुम्हाला भाजप पाहिजे. याचा जर योग्य ताळमेळ झाला, तर शिवसेनासुद्धा टिकेल. तुम्हाला जनतेच्या कामासाठी भाजप हवी आहे. तेसुद्धा साध्य करता येईल. परंतु, इकडे तिकडे जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.