नाशिक मनपा निवडणूक : ... अथक प्रतीक्षेनंतर अखेर मतदारयाद्या संकेतस्थळावर | पुढारी

नाशिक मनपा निवडणूक : ... अथक प्रतीक्षेनंतर अखेर मतदारयाद्या संकेतस्थळावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्यांमध्ये झालेल्या चुकांमुळे अथक प्रतीक्षेनंतर शुक्रवारी (दि.24) सायंकाळी मतदारयाद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन रूपाने झळकल्या. याद्या प्रसिद्धीनंतर यादीची प्रत मिळण्यासाठी शुल्क भरूनही याद्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मतदारयाद्यांवर हरकती घेण्यासाठीची मुदत वाढवून मिळण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी केली.

तांत्रिक चुकांमुळे प्रभाग क्रमांक 18 व 36 या दोन प्रभागांमधील काही मतदार लगतच्या सहा प्रभागांमध्ये समाविष्ट झाले होते. गुरुवारी (दि.23) हा गोंधळ झाल्याने याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब लागला. सहा प्रभागांच्या मतदारयाद्यांची प्रसिद्धी थांबवून उर्वरित 38 प्रभागांच्या मतदारयाद्या मनपाकडून गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करत गुरुवारी उशिरा त्या सहा प्रभागांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. राज्यातील 18 महापालिकांच्या मतदारयाद्यांची प्रसिद्धी गुरुवारी एकाच दिवशी झाल्याने सर्व्हरवर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याने याद्यांमधील दुरुस्ती रखडली होती. अखेर शुक्रवारी (दि.24) याद्या दुरुस्त करून सायंकाळी संकेतस्थळावर झळकल्या.

आठमध्ये सर्वाधिक, तर 40 मध्ये कमी मतदार
प्रारूप मतदारयाद्यांनुसार चारसदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वाधिक 37 हजार 419 मतदार असल्याचे समोर आले आहे. पुरुष मतदारांची संख्या 19 हजार 804 तर महिला मतदारांची संख्या 17 हजार 614 इतकी आहे. इतर मतदार एक आहे. प्रभाग क्रमांक 40 हा सर्वात कमी 7 हजार 143 मतदारसंख्या असलेला प्रभाग ठरला आहे. पुरुष मतदारांची संख्या 3,768 तर महिला मतदारांची संख्या 3,375 आहे. या प्रभागातच लष्करी हद्दीचाही भाग असल्याने प्रभागाचे क्षेत्र मोठे असले तरी मतदारसंख्या कमी आहे. तसेच इतर मतदारांची संख्या एकूण 54 इतकी आहे. यात सर्वाधिक 38 मतदार प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहे.

हेही वाचा :

Back to top button