नाशिक : शहरात 12 मॉडर्न रोड विकसित करणार | पुढारी

नाशिक : शहरात 12 मॉडर्न रोड विकसित करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे 12 रस्ते ‘मॉडर्न रोड’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने विभागीय अधिकार्‍यांनी सर्वेक्षण करून तत्काळ यादी सादर करण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त तसेच शहर अभियंत्यांकडून या रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे.

दर दोन-तीन वर्षांनी रस्त्याच्या डांबरीकरणावर होणार्‍या खर्चात बचत होण्यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी मुंबईच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागातील दोन याप्रमाणे शहरातील 12 रस्ते मॉडर्न रोड म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. 24 ते 30 मीटर रुंदीच्या प्रमुख रस्त्यांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक मॉडर्न रस्त्यावर 20 कोटींचा खर्च केला जाणार आहे. 12 रस्त्यांसाठी सुमारे 240 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मॉडर्न रस्त्यांसाठी चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील अनावश्यक कामे रद्द करून निधीची तरतूद केली जाणार आहे. तूर्त या मॉडर्न रस्त्यांसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता होऊ शकणार्‍या अर्थात अतिक्रमण, अडथळे मुक्त रस्त्यांची निवड करण्याचे आदेश आयुक्तांनी विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत.

विभागीय अधिकार्‍यांनी सुचविलेल्या रस्त्यांची पाहणी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे आणि शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्यामार्फत केली जाईल. मॉडर्न रोडबरोबरच इतर रस्ते आणि प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील दुभाजकांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button