नाशिक : सटाण्यात वीज कोसळून बैल ठार, चाळीतील 350 क्विंटल कांदा गेला वाहून | पुढारी

नाशिक : सटाण्यात वीज कोसळून बैल ठार, चाळीतील 350 क्विंटल कांदा गेला वाहून

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यात बुधवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास वरुणराजाने जोरदार सलामी दिली. तालुकाभरात सर्वत्र पाऊस झाला असला, तरी ब्राह्मणगाव व सटाणा मंडळात मात्र अल्पावधीत विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. पावसामुळे मुंजवाड येथे कांदा शेडमध्ये पाण्याचा प्रवाह शिरून लाखोंची हानी झाली, तर वीज पडून बैल ठार झाला.

तालुक्यात यंदा जून महिना अर्ध्याहून अधिक उलटूनही पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. दुसरीकडे सर्वसामान्यही विक्रमी उष्मा आणि उकाड्याने हैराण झाले होते. परंतु, बुधवारी (दि. 22) दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि दमटपणा असताना, त्यानंतर जोरदार वारे वाहून सगळे वातावरण बदलले. दुपारी चारनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. सुरुवातीला संथ सुरू झालेल्या पावसाने सहा वाजेनंतर चांगलाच जोर पकडला. विशेषत्वाने ब्राह्मणगाव व सटाणा मंडळात अतिशय जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मुंजवाड, खमताणे परिसरात अगदी ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. त्यामुळे उंबर्‍या ओहोळातून दुथडी पाणी वाहिले. काही ठिकाणी आजूबाजूच्या शेतातही पाणी शिरले. मुंजवाड येथे डांगसौंदाणे रोडवरील राजेंद्र दगाजी जाधव यांच्या कांदा शेडमध्ये शेत शिवारातील पाणी घुसल्याने 350 क्विंटल कांदा वाहून गेला. जाधव यांचे जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. येथीलच मल्हारवाडी शिवारातील कृष्णा उमाजी पिंपळसे या शेतकर्‍याचा बैल झाडाखाली बांधला होता, त्याच्यावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. या ठिकाणी बांधलेली इतर जनावरे सुरक्षितस्थळी हलवून बैलाला सोडण्यास आलेला पिंपळसे यांचा मुरलीधर हा मुलगा अवघ्या 10 फुटांवर असतानाच वीज कोसळली. सुदैवाने तो थोडक्यात बचावला. पिंपळसे यांनी नुकतीच बैल जोडी घेतली होती. त्यांची 40 ते 50 हजार रुपयांची हानी झाली आहे.

विक्रमी पावसामुळे सटाणा शहराजवळील नामपूर रोडवर सुरू असलेल्या सदोष कामामुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा न होता, ते थेट शेतात शिरले. त्यामुळे बबन दादाजी खैरनार या शेतकर्‍याच्या शेत गट नंबर 368/1 मधील जवळपास एक ते दीड एकर जमिनीची माती वाहून गेली. पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील कंपाऊंडचे नुकसान झाले तसेच चाराही वाहून गेला. म्हशीच्या गोठ्यात पाणी शिरल्याने नुकसान झाले तसेच शेजारील शेणखतही वाहून गेल्याने संबंधितांचे हजारोंचे नुकसान झाले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु, या ठिकाणी अद्यापही अपेक्षित कार्यवाही न केली गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कामामुळे शहरातील नववसाहत परिसरातही संपूर्ण रस्त्यावर सर्वत्र गुडघाभर पाणी साचले होते. काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ठेकेदाराने रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्याची सुविधा करण्याची मागणी होत आहे. सटाणा व ब्राह्मणगाव मंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील पेरण्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बागलाणमध्ये बुधवारी झालेल्या मंडळनिहाय पावसाची स्थिती (मिमीमध्ये)
सटाणा 63
ब्राह्मणगाव 69
वीरगाव 29.40
नामपूर 28
मुल्हेर 34
ताहाराबाद 14
डांगसौंदाणे 37
जायखेडा 54

हेही वाचा :

Back to top button