शिवसेनेची खरी सत्ता आणायचीय, दादा भुसे यांच्या निकटवर्तीयांची सूचक प्रतिक्रिया | पुढारी

शिवसेनेची खरी सत्ता आणायचीय, दादा भुसे यांच्या निकटवर्तीयांची सूचक प्रतिक्रिया

मालेगाव (जि. नाशिक) : सुदर्शन पगार
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकविल्यानंतर, नाशिक जिल्ह्यातून ज्यांच्या भूमिकेविषयी सर्वाधिक उत्सुकता होती, त्या कृषिमंत्री दादा भुसे यांनी एकूणच नाट्यमय घडामोडींना साजेसा, धक्कातंत्री प्रवास गुरुवारी (दि.23) केल्याने राज्याबरोबरच मालेगावकेंद्री खळबळ उडाली. शिंदे यांच्या बंडानंतर ‘मातोश्री ते वर्षा’ अशा घडामोडींमध्ये सक्रिय राहिलेले कृषिमंत्री भुसे हे गुरुवारी त्याच सूरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाले. खासगी विमानाने माजी मंत्री संजय राठोड यांच्यासह साधारण आठ विश्वासू सहकारी गुवाहाटीत सायंकाळी पोहोचल्याचे वृत्त व्हायरल झाले आणि दुसरीकडे मालेगाव शिवसेनेत स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यासमवेत भुसे यांचे छायाचित्र असलेले ‘आमची निष्ठा दादासाहेब, जिथे तुम्ही-तिथे आम्ही’ असे डीपी झळकण्याची स्पर्धा सुरू झाली.

दरम्यान, कृषिमंत्री भुसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कॉल स्वीकारले नाहीत. तेव्हा विश्वासू सहकार्‍यांशी संपर्क साधला असता, डॉ. जतिन कापडणीस यांनी, साहेब दुपारीपर्यंत मुंबईत होते. त्यानंतर सूरतमार्गे विमानाने गुवाहाटीला गेले अन् पोहोचलेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, कृषिमंत्री हे मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून की, शिंदे गटात सहभागी होण्यास गेले, याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भुसे यांची निश्चित भूमिका काय याबाबत कोणताही अंदाज अद्याप आलेला नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. दुसरे विश्वासू असलेले एक सक्रिय कार्यकर्ते यांनी मात्र वेट अ‍ॅण्ड वॉच. आपल्याला महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणायची आहे, असे उत्तर दिले. परंतु, सध्यादेखील शिवसेनेचीच सत्ता असल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी, ‘आता खरी सत्ता आणायचीय, त्यासाठी साहेब गडबडीत आहेत, तेव्हा दोन दिवस शांततेत घ्या. सर्व गोष्टी लवकरच स्पष्ट होतील, असे संकेतात्मक सांगत आपलीच सत्ता येणार, असा पुनरुच्चार केला.

हेही वाचा :

Back to top button