जळगाव : नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलीचा सापडला मृतदेह

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणारी १४ वर्षीय मुलगी नाल्याच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने वाहून गेली. ही घटना आज बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली असून सदरचा मृतदेह नाल्याच्या पाण्यात सापडला आहे.

याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गायत्री सुरेश मिस्तरी (वय-१४, रा. कोळ न्हावी, ता. यावल ह.मु.हरीविठ्ठल नगर जळगाव) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, गायत्री मिस्तरी ही वडील सुरेश शामराव मिस्तरी आणि आई सिमाबाई मिस्तरी यांच्यासह लहान बहिण सोनू सोबत राहत होती. आज बुधवारी रोजी सकाळी वडील सुरेश मिस्तरी हे अयोध्या नगरात कामावर निघून गेले. आई सिमाबाई घरात होत्या.

या दरम्यान गायत्री सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कोणालीही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. आरएमएस कॉलनीजवळ रामानंदनगरातून येणाऱ्या रस्त्यावरील लागणाऱ्या नाल्याजवळ गायत्री उभी होती. पाय घसरल्याने ती वाहत्या नाल्याच्या पाण्यात पडली. हा प्रकार काही सतर्क तरूणांच्या लक्षात आली. पण काही करण्याच्या आतच गायत्री पाण्यात बेपत्ता झाली.

यानंतर रामानंदनगर पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधाशोध करत असताना दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गायत्रीचा मृतदेह खंडेराव नगरातील नाल्याजवळ आढळून आला.

सुरूवातील अनोळखी म्हणून पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात रवाना केला. याबाबतची माहिती गायत्रीचे वडील सुरेश मिस्तरी यांना समजली. यानंतर सुरेश यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून मृतदेहाची ओळख पटविली.

गायत्रीच्या पश्चात आई-वडील, मनिषा, माधुरी, सरला, दुर्गा आणि सोनू अशा पाच बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का? 

Exit mobile version