Dhule Crime : घरगुती भांडणात सुनेची बाजू घेणाऱ्या वृद्धाची मूलाकडून हत्या | पुढारी

Dhule Crime : घरगुती भांडणात सुनेची बाजू घेणाऱ्या वृद्धाची मूलाकडून हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

घरगुती भांडणात नेहमी सुनेची बाजू घेणे एका वृद्धास चांगलेच महागात पडले आहे. या कारणावरून सख्ख्या मुलानेच आपल्या पित्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील कढईपाणी उमरदा शिवारात घडली आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून मारेकरी मुलगा पसार झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील कढईपाणी उमरदा शिवारात पेमा हिरा पावरा (वय 72) हे त्यांचा मुलगा सुक्राम पावरा आणि सून बायटाबाई यांच्यासमवेत राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून सुक्राम पावरा आणि त्याची पत्नी बायटाबाई यांच्यात नेहमी वाद होत होते. या घरगुती वादामध्ये पेमा हिरा पावरा हे नेहमी सून बायटाबाई यांची बाजू घेऊन मुलगा सुखराम यांना रागवत असत. काल सायंकाळी उशिरा याच कारणामुळे पावरा दाम्पत्या मध्ये वाद सुरू झाला. यावेळी वडील पेमा पावरा यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. पण मुलगा सुक्राम याने त्यांना हात धरून घराबाहेर काढले. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी सुक्राम याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातून संतापलेल्या सुक्राम याने घरात जाऊन तीक्ष्ण हत्यार आणून वडिलांच्या पाठीत खोलवर वार केला. हा वार वर्मी बसल्याने पेमा पावरा हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा क्षण पाहून सुक्रामने गावातील जंगलात असलेल्या डोंगराकडे पळ काढला. दरम्यान सुक्राम चा लहान भाऊ विक्रम पावरा हा घरी आला असता त्याला आई अंगणात रडत असल्याचे दिसले. त्यावेळी त्याने विचारणा केली असता वडिलांची हत्या झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.

त्यामुळे त्यांनी ही घटना पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात ही माहिती कळवली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ, पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. यासंदर्भात सुक्राम पावरा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला शोधण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button