नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी दोंदे पूल ते गोविंदनगरपर्यंत नदीच्या दोन्ही किनार्यांवर गॅबियन वॉल बांधून सुशोभीकरण करण्यासाठी 20 कोटी 37 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचा प्रशासकीय ठराव मंजूर करून तो महापालिकेने स्मार्ट सिटीकडे पाठविला आहे. हा प्रकल्प नंदिनीच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
याबाबत शिवसेना तसेच सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने मागणी करण्यात आले होते. नंदिनी अतिक्रमण, सांडपाणी, घाण, कचरा यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन नंदिनी नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही नदी गोदावरी नदीला जाऊन मिळत असल्याने गोदावरीही प्रदूषित होते. नंदिनीचे पर्यायाने गोदावरीचे प्रदूषण थांबावे, यासाठी दोंदे पूल ते गोविंदनगर म्हणजेच मुंबई नाका सर्व्हिस रोडपर्यंत दोन्ही किनार्यांवर गॅबियन वॉल बांधण्यात येणार आहे. याबाबत सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी याबाबत मागणी केली होती. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव आणि प्रशासकीय ठराव पाठवावा, असे स्मार्ट सिटीने 31 मार्च रोजी मनपाला कळविले होते. आयुक्त रमेश पवार यांनी 27 मे 2022 च्या महासभेवर याला मंजुरी दिली. त्यानंतर 31 मे रोजी प्राप्त झालेला हा 4 क्रमांकाचा ठराव पुढील कार्यवाहीसाठी स्मार्ट सिटीकडे पाठविण्यात आला आहे.
नंदिनी नदी ही गोदावरी नदीलाच जाऊन मिळते, तिचे जतन, संवर्धन होईलच, पर्यायाने गोदावरीचेही प्रदूषण रोखण्यास या प्रकल्पाने मदत होणार आहे. या दोन्ही नद्यांच्या रक्षणासाठी व नाशिककरांच्या आरोग्यासाठी स्मार्ट सिटीकडून आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. – चारुशीला गायकवाड (देशमुख) शिवसेना कार्यकर्त्या.