नाशिक : प्लास्टिकमुक्त नाशिकसाठी आयोजित बैठकीत व्यापारी-अधिकार्‍यांमध्ये चर्चा | पुढारी

नाशिक : प्लास्टिकमुक्त नाशिकसाठी आयोजित बैठकीत व्यापारी-अधिकार्‍यांमध्ये चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक प्लास्टिकमुक्त व्हावे याकरिता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे आम्ही नेहमीच पालन करीत आहोत. परंतु, प्रशासनाचा प्लास्टिकबाबतचा आग्रह केवळ किराणा दुकानदारांपर्यंतच मर्यादित आहे. अधिकारी दादागिरी करून दंड वसुली करतात. त्यामुळे प्लास्टिकला अगोदर पर्याय द्या मगच कारवाईचा बडगा उगारा, अशा शब्दांत किराणा व्यापार्‍यांनी अधिकार्‍यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला.

महाराष्ट्र चेंबरच्या बाबूभाई राठी सभागृहात नाशिक महानगरपालिका आणि नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेची प्लास्टिक बंदबाबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. बैठकीला नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम, मनपा आरोग्य अधिकारी आवेश पलोड, नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश मंत्री, माजी अध्यक्ष महेंद्रभाई पटेल, कार्याध्यक्ष संतोष राय यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी आवेश पलोड यांनी, 50 नव्हे तर आता 75 मायक्रॉन प्लास्टिकच्या पिशव्या वापरता येणार आहे. सर्व व्यापार्‍यांनी या नव्या निर्णयाचे स्वागत करावे, असे सांगितले. या प्रसंगी मनपा आरोग्य अधिकारी आवेश पलोड, व्यापारी अरुण लोखंडे, नाना जाधव, राहुल डागा, सुनील महाले, संतोष राय, महेंद्रभाई पटेल आदी उपस्थित होते.

प्लास्टिकला सक्षम पर्याय काय असेल याबाबतचे मंथन सुरू आहे. त्यावर नक्कीच योग्य तो पर्याय सुचविला जाईल. परंतु नाशिक प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. या अभियानासाठी स्थापन केलेल्या टास्कफोर्सची लवकरच जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी बैठक होऊन योग्य तो पर्याय सुचविला जाईल. – अशोक आत्राम, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

आम्ही प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. त्यामुळे प्रशासनाने आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंगवरच बंदी घाला. सोर्सेस बंद झाल्यास वापर करता येणार नाही. त्याचबरोबर प्लास्टिकला पर्याय काय? यावरही तोडगा काढा. – सुरेश मंत्री, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटना.

हेही वाचा:

Back to top button