नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लग्न करून तुझ्यासह आईचा सांभाळ करेल, शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवल्यास फायदा होईल असे आमीष दाखवून एकाने डॉक्टर महिलेस सुमारे ६२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील एका महिलेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित प्रसन्नकुमार नानाजी जगदाळे विरोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.
महिलेच्या फिर्यादीनुसार संशयित प्रसन्नकुमार जगदाळे याने ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत गंडा घातला. संशयिताने महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेत त्यांच्या आईच्या उपचारांची तरतूद होईल, तसेच महिलेसोबत विवाह करून नवीन फ्लॅटमध्ये आईचा सांभाळ करून राहू असे आमिष संशयिताने दिले. त्यानंतर संशयिताने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे आमीष दाखवून महिलेसह त्यांची आई व मावशीचे खाते सुरु करून त्यांच्याकडून पैसे घेतले. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यानंतर जगदाळे यास तोटा झालेला असतानाही त्याने महिलेस खोटे सांगून ५० लाख रुपयांचा फायदा झाल्याचे सांगत दिशाभूल केली.
गुंतवणूक केल्याचा मोबदला म्हणून महिलेकडून संशयिताने १९ लाख ९७ हजार ६४४ रुपये ब्रोकरेज म्हणून घेतले. त्यानंतर डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेकडून संशयिताने ३८ लाख सहा हजार ८५० रुपये घेतले. मात्र पैसे शेअर मार्केट मध्ये न गुंतवता संशयिताने फ्लॅट घेतला. तो फ्लॅट महिलेच्या नावावर करण्यास संशयिताने नकार दिला. त्याचप्रमाणे संशयिताने इतर कारणे सांगून महिलेकडून चार लाख ४२ हजार रुपये घेतले होते. याप्रकारे संशयिताने महिलेकडून सुमारे ६२ लाख ४६ हजार ४९४ रुपये घेत फसवणूक केली. वारंवार मागणी करूनही संशयिताने पैसे न दिल्याने महिलेने सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेत फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.