नाशिक : वावीसह 11 गावे योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत | पुढारी

नाशिक : वावीसह 11 गावे योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा :
वावीसह 11 गावे पाणीपुरवठा योजनेची वीजबिलाची चालू थकबाकी सुमारे वीस लाखांची असल्यामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. ऐन उन्हाळ्यात या योजनेतील संबंधित गावांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये यासाठी समितीचे अध्यक्ष विजय काटे यांनी स्वत:चा दोन लाख रुपयांचा धनादेश महावितरण कंपनीला दिला आहे. खंडित वीजपुरवठा जोडला गेल्याने योजना पूर्ववत सुरू झाली असून, नागरिकांची तारांबळ थांबणार आहे.

गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी गोदावरीच्या उजव्या कालव्यातून कोळगाव माळ शिवारात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून तलाव बांधून वावीसह 11 गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबवली आहे. या योजनेत येणार्‍या वावीसह पाथरे खुर्द, पाथरे बुद्रक, वारेगाव, सायाळे, मलढोण, मिरगाव, दुशिंगवाडी, कहांडळवाडी, मिठसागरे, शहा या गावांचा समावेश आहे. सध्या चालू 2021 ते 22 या वर्षाची थकबाकी 20 लाखांवर गेली असून, मागील थकबाकीचा आकडा सुमारे 80 लाखांच्या घरात आहे. थकीत वीजबिलाअभावी वारंवार ही योजना बंद आहे. ऐन उन्हाळ्यात या योजनेचा वीजपुरवठा पुन्हा खंडित केल्याने पाणीयोजना बंद झाली होती. परिणामी नागरिक हैराण झाले होते. माजी सरपंच विजय काटे यांनी 2 लाखांचा धनादेश महावितरण कंपनीला बिलापोटी भरल्याने पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे.

पाणीपट्टी वसुली न करणार्‍या ग्रामसेवकांविरुद्ध आंदोलन
वारंवार वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे. परंतु या योजनेत समाविष्ट गावांपैकी एकही ग्रामसेवक पाणीपट्टी वसुली करून थकबाकी भरत नसल्यामुळे वीजबिल भरण्यास टाळाटाळ होत आहे. थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहून पाणीपट्टी वसुली करावी व पाणीपुरवठा वीजबिलांची थकबाकी भरावी. जे ग्रामसेवक मुख्यालयात राहून पाणीपट्टी वसूल करून थकबाकी भरणार नाही अशा ग्रामसेवकांविरुद्ध येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष विजय काटे, सरपंच प्रशांत करपे यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button