नाशिक : सर्पदंश मृत्यूचे प्रमाण कमी करा- डॉ. भारती पवार, जि. प. मध्ये कार्यशाळा | पुढारी

नाशिक : सर्पदंश मृत्यूचे प्रमाण कमी करा- डॉ. भारती पवार, जि. प. मध्ये कार्यशाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; दुर्गम भागातील डॉक्टरांनी एकमेकांच्या संपर्कात राहून सर्पदंशानंतर रुग्णांवर वेळीच उपचार करून जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण कसे वाचतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे पावसाळापूर्व तयारी म्हणून जिल्हयातील दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्पदंश उपचार व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी दृकश्राव्य माध्यमातून आरोग्यराज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकार अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर उपस्थित होते.

पावसाळा पूर्व नियोजनासाठी सर्पदंश व्यवस्थापन व उपचार याबाबत नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या पथकातील ८४ डॉक्टर्ससाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्याशाळेमध्ये डॉ. भारती पवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग नोंदवला. डॉ. भारती पवार म्हणाल्या दुर्गम भागात आदिवासी गरीब लोकांना सर्पदंश होण्याचे प्रमाण मोठे आहे. साप चावल्यानंतर रुग्णाला कोठे घेऊन जायचे याविषयी समाजामध्ये चांगल्याप्रकारे जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्पदंशानंतर रुग्णाचा जीव वाचू शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी डॉक्टरांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. तसेच नावीन्यपूर्ण काही उपचार पद्धतीबाबत एकेमेकांना माहितीची देवाणघेवाण करावी, म्हणजे सर्पदंशामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्पदंशावरील औषध पुरवठा कमी पडणार नाही, त्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जाईल. खासगी रुग्णालयात औषध उपलब्ध होईल याबाबतचे नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी माताबाल संगोमन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे, डॉ शैलेश निकम , डॉ. राहुल हाडपे यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

Back to top button